
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : तेलंगणातील मोईनाबाद येथे बुधवारी रात्री उशिरा टीआरएसच्या चार आमदारांना लाच देताना भाजपच्या नेत्यांना रंगेहात पकडण्यात आले. सायबराबाद पोलिसांनी 100 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली आहे.
वृत्तानुसार, मोईनाबाद पोलिसांनी टीआरएस आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करताना भाजप नेत्यांना कथितपणे पकडले. छाप्यादरम्यान टीआरएसचे चार आमदार पायलट रोहित रेड्डी, बिरम हर्षवर्धन रेड्डी, रेगा कंथाराव, गुव्वाला बलराज फार्म हाऊसवर उपस्थित होते.
सायबराबाद पोलिसांनी सांगितले की, आम्हाला टीआरएस आमदारांकडून पैसे, पदाचं आमिष दाखवले जात असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी ही माहिती आमच्याशी शेअर केली. त्या माहितीच्या आधारे आम्ही या फार्मवर छापा टाकला आहे. या माहितीवरून आम्ही छापा टाकला असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
रंगा रेड्डी यांच्या फार्महाऊसवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्याप्रकरणी टीआरएस आमदार पायलट रोहित रेड्डी यांनी एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीनंतर मोईनाबाद पोलीस ठाण्यात रामचंद्र भारती, नंदा कुमार आणि सिंहयाजी स्वामी या तिघांविरोधात आयपीसी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये रोहित रेड्डी यांनी आरोप केला आहे की, दिल्लीचे रामचंद्र भारती आणि हैदराबादचे नंद कुमार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर दिली.
रोहित यांनी सांगितले की, त्यांना 100 कोटींची ऑफर देण्यात आली होती. यासोबत ते म्हणाले की ज्यांनी ही ऑफर दिली ते भाजपचे आहेत. भाजपमध्ये सामील न झाल्यास ईडी, सीबीआयकडून फौजदारी खटले आणि छापे टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.