
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या रागसुधा आर. यांच्यासमोर परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचं मोठं आव्हान आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षकपदी कार्यरत असतांना रागसुधा आर. यांचा पूर्वानुभव गाठीशी असला तरी त्यावेळी अधिकाराची पूर्ण जबाबदारी त्यांच्या शरीरावर नसल्याने म्हणावा तसा त्राण नव्हता. आता त्यांच्या शरीरावर अधिकाराची पूर्ण जबाबदारी आहे. जे काही निर्णय घेणे आवश्यक आहे, ते त्यांनाच घ्यावे लागणार आहेत. एका बाजूला शासनाची भूमिका निभावताना दुसऱ्या बाजूला वरिष्ठांचे आदेश शीरसावंद्य मानत असतांनाच येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली जावी यासाठीचे सर्व काही निर्णय सहकारी अधिकारी-कर्मचारी व जनतेला खुश ठेवणे गरजेचे कसे राहील, याचीही पूरती काळजी घ्यावी लागणार आहे.
काल परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी व दस्तूरखुद्द पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर धडक देऊन ज्या व्यथा कथन केल्या आहेत, त्या अत्यंत बोलक्या व शेलक्या सुध्दा आहेत. ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. ही पूर्वापार चालत आलेली म्हण अनुभवातूनच आलेली असते. परंतु मागील काही दिवसांपासून शहरात व परिसरात चोर, लुटारुंनी मांडलेला उच्छाद मनाला वेदना देणारा असाच म्हणावा लागेल. ऐन सणासुदीच्या निमित्ताने प्रत्येक व्यापारी बांधवांनी धंदा होईल या अपेक्षेने आपापल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात माल भरलेला असतो परंतु त्याच परिस्थितीचा गैरफायदा उचलण्यासाठी टपून बसलेल्या चोरांनी आपले इक्षिप्त साधण्याचा कुटील डाव शहरात अनेक ठिकाणी घाट घातल्याचे दिसून आले. ज्या मोबाईल शॉपीमधून करोडोंचा माल लंपास केला, त्याचे आयुष्य तर बर्बाद झाले असावे एवढे नक्की. चोरी झालेला हा माल कसा मिळवता येईल, यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे यात वादच नाही. तथापि तो माल मिळावा अशी दुकान मालकाची मनस्वी इच्छा असणे साहजिकच आहे. आपल्या दुकानात एवढा मोठा किमती माल भरतांना मालकाने सुध्दा काळजी घेणे गरजेचे असते. अशा वेळी पोलिसांचीही गस्त राबविली जाते तितकेच महत्वाचे ठरले जाते. यातूनही तोडगा काढायचा झाल्यास पोलीस व व्यापारी यांच्या समन्वयातून गस्त तैनात केली गेली असती तर अशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्याची पाळीही आली नसती परंतु त्यासाठी हे नियोजन दिवाळीच्या किती तरी अगोदर पोलीस अधीक्षक किंवा त्या बिट अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात तशी मोहीम राबविण्याची अंमलबजावणी करणे गरजेचे होते. निव्वळ पोलीस नियंत्रण कक्षातील अवलंबून राहाणे योग्य नाही. लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक असे पोलीस बल उपलब्ध नसते. अधीक्षकांनी ही मजबूरी असते. सहकार्याची व समन्वयाची भावना असेल तर सर्व काही ठिक होतं असते.
परभणी शहर व जिल्हाभरातील गुन्हेगारीचा रेषो मागील अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक अशी चालणारी खूनाची शृंखला अस्वस्थ करणारी तर आहेच त्याशिवाय पोलीस यंत्रणेची पूरती बदनामी ठरु शकणारी सुध्दा आहे. जबरी हल्ले, ३०७ सारख्या भयाण घटना मागील काही दिवसांपासून पराकोटीला गेल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवरून पायी रहदारी करणाऱ्या अबाल वृध्द महिला व पुरुषांवर होणारे जीवघेणे हल्ले व त्यातील दागिन्यांची लूट चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.भूरट्या चोऱ्या, जबरी चोऱ्या, घरफोड्या, दुकाने फोडून होत असलेली मोठ्या प्रमाणातील आर्थिक लूट, हे कमी म्हणून की काय, आता तर याच चोर, लुटारुंनी चक्क देवी देवतांच्या मंदीरांवरही डल्ला मारायला केलेली सुरुवात म्हणजे कशाचे द्योतक समजायचे ? देवालाही न घाबरणारे हे चोर, लुटारु किती मग्रुर बनले गेले आहेत यांचा विचारही न केलेला बरा. कायदा व सुव्यवस्थेचे पूरते धिंडवडे काढणारे हे चोर, लुटारु शहराच्या अनेक भागांमध्ये आपले बस्तान बसवून असल्याचे या सर्व परिस्थितीवरुन स्पष्ट झाले आहे, असं म्हटलं तर मुळीच वावगे ठरु नये.
कायदा व सुव्यवस्थेला आणखी मोठा धक्का देणारे अंमली पदार्थांचे सेवन करणारे हेच गर्दुल्ले शहरात विशेषतः रेल्वे स्थानक, बस स्थानक, शनिवार बाजार परिसर, ऐन गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचा वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याकडूनही अनेक लूटीच्या व जीव घेणे हल्ल्याच्या घटना घडल्याचा इतिहास परभणीत वर्षानुवर्षे चालत असावा जणू कित्येकांच्या तोंडून ऐकायला मिळाले तर चुकीचं ठरु नये.
वाढते गुन्हेगार व गुन्हेगारीचा बिमोड किंवा समूळ उच्चाटन करावे असे कर्तव्यावरील कोणाही अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटणे स्वाभाविक आहे. खाकी वर्दी किंवा पोलीस खात्याची बदनामी व्हावी, असे कोणालाही वाटणार नाही किंवा ते संयुक्तिकही ठरणार नाही परंतु कर्तव्यात कसूर व एखाद्या आरोपीला पाठीशी घालणेही उचित ठरणारे नसते. ज्यामुळे आपण स्वतः व वरिष्ठ आणि पोलीस खात्याचीही बदनामी झालेली योग्य ठरणारे नसते.
दरम्यान शहर व जिल्हा क्षेत्रात दिवसेंदिवस नागरीकरण वाढत आहे. उद्योग, धंद्यांमध्ये कमालीची वाढ होत आहे. आस्थापने, कार्यालये व अन्य उपजिविकांची साधने मोठ्या प्रमाणात वाढत राहाणे ही स्वाभाविक आहे. त्या तोडीने गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ होणे हा कर्मधर्म संयोग किंवा ओढा ओघाने ते होतच असते. नव्हे सामाजिक व्यवस्थेला लागलेली एकप्रकारे कीडच म्हणावी लागेल. कांही फार परिस्थिती नुसार तर काही वेळा अशा प्रकारांना संगतींमुळे अशा वाईट सवयींचा होणारा उदय त्यांच्या आयुष्याचा ऱ्हास ही ठरला जातो. गुन्हेगार आणि गुन्हेगारीचा वेळीच बंदोबस्त होणै गरजेचे असते परंतु त्यासाठी आवश्यक असणारं पोलीस बळ उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही कायद्याची बूज राखणे पोलीसांना ते शक्य होत नसते हेही तितकेच खरे आहे. वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने जेवढे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक पोलीस बळ असणे गरजेचे असूनही ते शक्य नसल्याने आदेशाचे पालन करीत व आहे त्या स्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यावरील सर्व पोलीस बळ प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना दिसत असते हे मुळीच नाकारता येणार नाही. तथापि अपुऱ्या पोलीस बळापुढे कायदा व सुव्यवस्था राखता राखता हतबल होणारी पोलीस यंत्रणा वाढते गुन्हेगार व गुन्हेगारीपुढे मात्र कमी पडताना दिसून येत असते. प्रसंगी त्यासाठी पोलिसांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणारं पोलीस बळ मिळालं म्हणून अनेकदा वरिष्ठांच्या आदेशानुसार चालावे लागते. कित्येकदा बदनामीची दूषणे देणारेही काही कमी नसतात. शासनाने या सर्व गंभीर बाबींचा विचार करणे गरजेचे असते परंतु या सर्व आवश्यक बाबी वा त्रुटी शासनापर्यंत जावू शकतात असेही नसते. खात्यांतर्गत वरिष्ठांनीच अशा त्रुटी किंवा गरजांची वेळीच दखल घेऊन शासनाकडे यांचा पाठपुरावा करणे आवश्यक असते परंतु कधी कधी तेही होत नसते परिणामी त्यांची किंमत मात्र स्थानिक पोलीस दल किंवा अधिकाऱ्यांनाच सहन करावी लागते.
परभणी शहर व जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेने आवश्यक तेवढे पोलीस बल तैनात राहिले जावे, येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली जावी, येथे गुन्हेगार व गुन्हेगारीचा बिमोड करता यावा यासाठी पुरेसे पोलीस बल दिले जावे, त्यासाठीची त्यांना कोणतीही उणीव राहाता कामा नये, असे जसे पोलीस खात्याच्या वरिष्ठांना वाटणे स्वाभाविक आहे तसेच येथील स्थानिक राजकारणी मंडळी विशेषतः लोकप्रतिनिधींनाही वाटणे गरजेचे ठरते. लोकप्रतिनिधी, नागरिक व पोलीस यांच्या समन्वयातून जसे लोकहित साधणे महत्वाचे ठरते तसेच कायदा व सुव्यवस्था सुध्दा अबाधित राखली जावी यासाठी सर्वांच्या प्रयत्नांतून ते साकारले जाणे किंवा ते प्रत्यक्षात उतरविले जाणे महत्वाचे असते अन्यथा चांगले केले तर आम्ही अन् वाईट झाले तर त्यांनी असा गोड समज करुन देणारेही भरपूर असतात. कायदा व सुव्यवस्था कोलमडली की, द्या पोलिसांना दोष, गुन्हेगारी व गुन्हेगार वाढले की पोलीस स बदनाम, त्यापेक्षा स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी असतेच ना, ही भावना जर प्रत्येकांनी जोपासली अन् पोलिसांना सहकार्य केले तर निश्चितच त्यांचेही मनोधैर्य वाढल्याशिवाय राहाणारे नाही. पोलीस अधीक्षक पदाची धुरा शीरावर घेतलेल्या रागसुधा आर.यांच्या समोर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जी जी आव्हाने उभी राहिली जातील, त्याचा त्या नक्कीच कठोरपणे सामना तर करतीलच शिवाय गुन्हेगार व गुन्हेगारीचा ही बिमोड केल्याशिवाय राहणार नाहीत ना कुठेही कमी पडणार नाहीत, एवढा विश्वास बाळगायला मुळीच हरकत नसावी. त्यांच्या कठोर कर्तृत्वाला सॅल्यूट ठोकून त्यांची पुढील सर्व वाटचाल यशस्वी ठरतो हीच विनम्र प्रार्थना !