
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘भारत जोडो’ यात्रा 8 नोव्हेंबर रोजी वझरगा येथे दुपारचे जेवण आणि विश्रांतीसाठी थांबणार आहे. या यात्रेच्या विश्रांतीची वझरगा येथे जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर दरम्यान भारत जोडो पदयात्रा सुरू केली आहे. या पदयात्रेचे दिनांक 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील देगलूर येथे आगमन व मुक्काम होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता ही पदयात्रा देगलूरहुन प्रस्थान होऊन वझरगा येथे 11 वाजता पोचणार आहे. समग्र महाराष्ट्राला भारत जोडो यात्रेच्या आगमनाची उत्सूकता लागली आहे. त्यामुळे देगलूर तालुका व नांदेड जिल्ह्यात तयारीची लगबग मोठ्या उत्साहात सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. ही सर्व तयारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व विधान परिषद प्रतोद आमदार अमरभाऊ राजूरकर, देगलूर-बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय युवाआमदार जितेशभाऊ रावसाहेब अंतापुरकर आणि काँग्रेस जिल्हा कमिटी वरीष्ठ उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या डॉ.सौ. मिनलताई पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. व वझरगा येथिल ग्रामस्थही उत्स्फूर्तपणे या नियोजनात सहभागी होत आहेत.