
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मागील अनेक वर्षांपासून लोडशेडिंगचा सततचा त्रास, या न त्या कारणांमुळे वांरवार गुल होणारी वीज अत्यंत त्रासदायक व डोकेदुखी ठरली जात आहे. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे औद्योगिक वसाहतीला नियमित व मुबलक वीज मिळणे दूरापास्त होऊन बसले आहे. त्याचाच परिपाक म्हणून येथे टाटा किंवा बिर्ला सारख्या एखाद्या समुहाचा कायमस्वरुपी उद्योगही येणे कठीण होऊन बसले आहे. अत्यंत खेदाची बाब म्हणजे मागील सत्तर वर्षांपासून आहे त्याच कमी दाबाच्या रोहित्रावर अवलंबून राहिलेल्या समस्त परभणीकरांना नियमित व मुबलक असा वीजपुरवठा कधी सुरू केला जाईल असा रोकडा सवाल येथील त्रस्त जनता विचारीत आहे. किंबहुना त्याच प्रकरणाची दखल घेत राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परभणीच्या विजेची समस्या निवेदनाद्वारे कानी घातल्याचे समजते. एवढ्यावरच न थांबता प्रत्यक्ष भेट घेऊन हा प्रश्न तडीस लावला जावा यासाठी जणू साकडेच घालणार आहेत असे त्यांच्या कथनातून स्पष्ट होत आहे.
उशीरा का होईना परंतु सत्तेची ऊब मागील काळात घेतलेल्या भाजपाला किंवा भाजपाच्या या स्थानीय नेत्यांना परभणी जिल्ह्याच्या वीज समस्येचीच नाही तर सर्वांगीण विकासाची कोणतीही कास धरली नसल्याची चर्चा सर्वत्र आहे. निजामकालीन जिल्हा असूनही विकासापासून कोसो दूर ठेवणाऱ्या भाजपाने परभणीचा ऱ्हास न होऊ देता कॉंग्रेस – राष्ट्रवादीची री ओढता कामा नये असंही येथील जनतेला वाटणे स्वाभाविक आहे.
परभणीच्या पाठीमागून कार्यान्वित झालेले लातूर, हिंगोली, जालना या जिल्ह्यांचा कमालीचा विकास झाला आहे. त्या त्या जिल्ह्यांच्या विकासाची बागडोर मातब्बर अशा नेत्यांच्या हाती एकसुत्री राहिल्यानेच त्या जिल्ह्यांचा विकास साध्य होऊ शकला परंतु परभणी शहर किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी मात्र सातत्याने सापत्न भावाची वागणूक देत जिल्हाच जणू वाऱ्यावर सोडून देत फक्त आणि फक्त राजकीय नियुक्ती व तिकीट वाटपाची सुत्रंच आपल्या हाती ठेवल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने तरी परभणीचा भरीव विकास साधावा सत्तेतील भागीदार भाजपाने पुढाकार घ्यावा यासाठीचे प्रयत्नही
बबनराव लोणीकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले तर परभणीतील जनता धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही एवढे नक्की.