
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : “या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय”, शेतकरी – शेतमजूरांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, झाल्याच पाहिजेत, ५० खोके, एकदम ओके” या व अशा नानाविध घोषणांनी परिसर दणाणून सोडलेल्या जिल्हा शिवसेनेचा भव्य असा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य रस्त्याने आलेल्या मोर्चाचे नेतृत्व विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा तथा शिवसेनेच्या रणरागिणी, उपनेत्या ज्योती ठाकरे, मुंबईतून परभणी जिल्ह्यासाठीचे असलेले शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री रवींद्र वायकर, स्थानिक शिवसेना खासदार संजयजी जाधव आणि आमदार डॉ. राहूल पाटील आदी मान्यवर नेत्यांनी केले. आवेशपूर्ण घोषणा आणि राज्य सरकार विरोधात असलेली जी आक्रमकता उपस्थित नेत्यांच्या भाषणातून दिसून आली ती कमालीची होती.
सरसकट पंचनामे आणि सरसकट नुकसान भरपाई देऊन शेतकरी व शेतमजूरांना हक्काचा दिलासा दिला जावा, अशी मागणी सर्वच नेत्यांकडून यावेळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातील प्रांगणात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी उपस्थित नेत्यांनी आपला आक्रोश व्यक्त करत सरकारवर कमालीचे ताशेरे ओढले. राज्यात झालेलं सत्तांतर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन करावी लागलेली पायउतार या दोन्ही बाबी तशा जिव्हारी लागणे स्वाभाविकच आहेत. गद्दारी करुन ४० आमदारांना फोडणाऱ्या एकनाथ शिंदे व पडद्यामागून सुत्र हलविणाऱ्या फडणवीस यांच्यासह भाजपालाही यावेळी उपस्थित नेत्यांकडून खडेबोल सुनावले गेले. शिवाय पर्जन्यवृष्टीमुळे व परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल न घेता प्रशासकीय यंत्रणेने खोटे पंचनामे करुन व अपुऱ्या नोंदी दाखवून जो अमानवीय अन्याय केला आहे त्याबद्दलही कमालीचा संताप व्यक्त करण्यात आला. हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवसैनिक व पदाधिकारी यांच्यात तीव्र संताप व्यक्त केला गेला. लाखोंचा पोशिंदा बळीराजावर अस्मानी संकटाने जो घाला घातला, त्यामुळे कित्येकांचे संसार उध्वस्त झाले. कात्येकाने या त्रासाला कंटाळून फाशी घेत आपले जीवन संपविले. परिणामी कित्येक आता, बहिणींचे सौभाग्य हिरावले गेले. कित्येकांची गुरे ढोरे दगावली गेली. कित्येकांनी व्याजाने व दाग दागिने मोडून शेतीसाठी काढलेला सर्व पैसा वाया गेला.
सभेनंतर उपस्थित नेते व पदाधिकारी यांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना त्यांच्या दालनात जाऊन भेटले. त्यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात गांभीर्याने विचार करुन सरसकट पंचनामे व सरसकट मदतीचे आवाहन यावेळी करण्यात आले.