
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ खोके सरकार’ असे टीकास्त्र सोडल्याने वातावरण तापले असून फ्रिजमधून खोके कुठे गेले, याचा शोध घेणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना दिला आहे.
ठाकरे यांनी चिखली येथे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी इशारा दिल्याने या मुद्दय़ावरुन आता शिंदे व ठाकरे गटामध्ये जुंपणार असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेतील अनेक कंत्राटे आणि व्यवहारांची कॅगकडून चौकशी सुरू झाली असून त्या व अन्य माध्यमातून ठाकरे गटामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असून त्याबाबत आसाममध्ये सेवा बजावणाऱ्या मराठी भाषिक राजपत्रित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. नवी मुंबईत आसाम भवनासाठी राज्य सरकार जागा देणार आहे.