
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणी व नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे उमेदवारांना त्रास होत असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात यावेत अशी मागणी माजी सभापती संतोष वरकड यांनी केली आहे. या संदर्भात तहसीलदार मंठा यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दि.28 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्र ऑनलाइन भरणे व स्वीकारणे चालू आहे. तांत्रिक अडचणी व नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्यामुळे एक नामनिर्देशनपत्र भरण्यास दोन तासाचा विलंब लागत असून रात्रभर जागरण करून उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरावी लागत आहेत. येत्या दोन डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख असून तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र भरू शकणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवारांना कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत ऑफलाइन नामनिर्देशनपत्र देऊन ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन प्रक्रियेतूनच नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात यावेत अशी मागणी संतोष वरकड यांनी निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व संबंधितांना पाठविण्यात आले आहेत.