
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन ३ डिसेंबर रोजी समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा समाज कल्याण अधिकारी,अमरावती जिल्हा परिषद कार्यालय तसेच शहरातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.जनजागृती रॅलीचा मार्ग इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरु होऊन गर्ल्स हायस्कूल चौक ते पुढे पोलीस कल्याण पेट्रोल पंप येथून पोलीस आयुक्त कार्यालयामार्गे सामाजिक न्याय भवन असा राहील.सुरुवातीला सकाळी ९ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन रॅली मार्गस्थ होईल.दिव्यांग जनजागृती रॅलीमध्ये विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,मुख्य कार्यकारी अधिकारी,महानगरपालिका आयुक्त,समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आदी मान्यवर उपस्थित राहतील.या रॅलीमध्ये शहरातील अंध प्रवर्गाच्या दोन शाळा,मुकबधिरांच्या तीन तर मतिमंदांच्या सहा शाळा तसेच अस्थिव्यंगांच्या दोन शाळा अशा एकूण १३ शाळा-कर्मशाळेतील सुमारे पाचशे ते सहाशे कर्मचारी सहभागी होणार आहेत.नागरिकांमध्ये दिव्यांगांविषयी जनजागृतीचा संदेश पोहचविण्यासाठी रॅलीमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा,ब्रीदवाक्य,फलक यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी दिली आहे.