
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
राज्यात सध्या 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून, सरपंच आणि सदस्य पदासाठी ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकाराले जात आहे. मात्र कालपासून निवडणुक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने अर्ज भरण्याची प्रकिया ठप्प पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारावे अशी मागणी करणारे पत्र धनंजय मुंडें यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत सरपंच व अन्य उमेदवारांचे नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगामार्फत सध्या सुरू असून, यांतर्गत अर्ज सादर करताना निवडणूक आयोगाची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची पळापळ पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारावे अशी मागणी करणारे पत्र धनंजय मुंडें यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
अवघ्या दोन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच आणि सदस्य पदासाठी इच्छुकांची धावपळ उडाली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन केंद्रात उमेदवार गर्दी करत आहे. मात्र अशात निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने इच्छुकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासाठी अनेक ठिकाणी इच्छुकांनी अक्षरशः रात्र जागून काढली आहे. मात्र असे असतांना देखील वेबसाईट चालत नसल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.