
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
श्रमजीवी संघटनेची पत्राद्वारे मागणी
जव्हार:-जव्हार नगर परिषद क्षेत्रामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या नावा पुढे आईचे नाव लावून महिलांना समान अधिकार मिळण्यासाठी श्रमजीवी संघटनेने पंचायत समिती कार्यालय जव्हार येथे सभापती दालनात उपसभापती दिलीप पाडवी व गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.समाजातील महिला वर्ग नेहमीच वंचित व दुर्लक्षित घटक मानला जातो.संविधानाने सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान केलेला असून तो समाजातील प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.
पंचायत समिती कार्यालय जव्हार येथे श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात २०२२ हे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने किमान अमृत महोत्सवी वर्षात तरी प्रत्येक मातेला तिचा समानतेचा अधिकार मिळायला हवा.यासाठी जन्म दिलेल्या तिच्या बाळाच्या नावासमोर त्याच्या वडिलांप्रमाणेच मातेचे नाव सुद्धा लागले पाहिजे.त्यासाठी जव्हार नगरपरिषद क्षेत्रामध्ये जन्माला येणाऱ्या बाळाच्या जन्म दाखल्याच्या वडिलांच्या नावासमोरच आईचे नाव लिहिले गेले पाहिजे व हे सर्व सक्तीचे करून सर्व मातांना त्यांचा समानतेचा अधिकार देण्यात यावा व असा ठराव सभेने करावा तसेच या मागणीची एक प्रत शासनाकडे पाठवावी अशी मागणीही पंचायत समिती कार्यालय तसेच जव्हार नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.