
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत ध्वजदिन २०२२ निधी संकलन शुभारंभ दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन सभागृहाच्या नवीन इमारतीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे,जिल्हाधिकारी पवनीत कौर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमामध्ये शहीद जवानांच्या वीरपत्नी,वीरमाता,वीरपिता,शौर्यपदकधारक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नी ज्यांचे विशेष गौरव पुरस्काराच्या मदतीची प्रकरणे मंजूर झाली आहेत, त्यांना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.ध्वजदिन निधीस सढळहस्ते मदत करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला नागरिक,माजी सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी केले आहे.देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे,त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजनिधीचा विनियोग करण्यात येतो.देशाच्या सीमा आणि स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करतांनाच देशात उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थाविषयक समस्या,नैसर्गिक आपत्तीत नागरिकांच्या सहाय्याला त्वरेने धावून जाणाऱ्या सैनिकांना ध्वजदिन निधी संकलनातून सहाय्य करण्यात येते.