
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत सत्तांतरानंतर आणि फाटाफुटीनंतर समीकरणे बदलली आहेत. रस्सीखेचमध्ये शिंदे गटाने जास्तीत जास्त आमदार ओढल्याने जिल्ह्याच्या राजकारणात दोन्ही गटात सामना रंगला आहे. मुंबईनंतर सर्वाधिक घडामोडी सध्या औरंगाबादच्या राजकीय पटलावर घडत आहे. आता आमदार रमेश बोरनारे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच त्यांना ललकारले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्षे वाया घालवली, अशी घणाघाती टीका आमदार रमेश बोरनारे यांनी केली आहे. खैरेंच्या खासदारकीच्या काळात जिल्ह्याचा विकास खुंटल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या काळात जिल्ह्यांचा विकास झाला नसल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खैरे हे स्तूतीसुमने उधळत होते. शिंदे हे देवमाणूस असल्याचे खैरे सांगत होते, असा दावा बोरनारे यांनी केला. तेच आता खोके खोके करत असल्याचा आरोप बोरनारे यांनी केला आहे. खैरे यांचे डोके तपासून घ्यावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
बोरनारे यांनी खैरे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. आपण तळागाळात काम करतो. खैरेंनी 20 वर्षे जिल्ह्याची खासदारकी उपभोगली आहे. त्यामुळे त्यांनी वैजापूर तालुक्यातील एखाद्या गावात गुगल मॅपचा वापर न करता, फिरुन दाखवावं, असं आव्हान त्यांनी दिलं.आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या आमदारकीत तालुक्यात विकासाची, पाणी पुरवठ्याची मोठं काम मंजूर करुन आणली आहेत. खैरे यांनी असं एकतरी उदाहरणं दाखवावं, असे बोरनारे म्हणाले. खैरे हे एका पाऊलावर शिंदे गटात येतील असा दावा ही बोरनारे यांनी केला.