दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
लहरी निसर्गाशी मुकाबला करणे कठीण
जव्हार:- पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणारे बहुसंख्य शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने खरीप हंगामात शेती करून धान्य मोठ्या कष्टाने पिकवने हे पिढ्यान-पिढ्या आजही चालू आहे परंतु मोसमी पाऊस आणि निसर्गाचा लहरीपणा या सगळ्या चक्रमुळे या भागातील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे अनेक वर्षी दिसून आले आहे.यामुळे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला पसंती देऊन यातून अर्थाजन करायला सुरुवात केली आहे.
पशुधनाच्या खाद्य किमतीत भरमसाठ वाढ,दूध विकून मिळणारा तुटपुंजा मोबदला त्यामुळे पारंपरिक जोड व्यवसाय शेतकऱ्यांनी बंद केला होता परंतु आता दुधाला चांगला भाव मिळत असल्याने जव्हार तालुक्यातील तरुण शेतकरी पुन्हा या व्यवसायाकडे वळला आहे.वर्षभरापूर्वी ५० रुपये लिटर दराने विक्री होणारे म्हैशीचे दूध सध्या ६० ते ८० रुपयांवर पोहोचले आहे.शिवाय संपूर्ण जव्हार तालुक्यातून जवळपास दोन हजार लिटर दूध उपलब्ध होत असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन कार्यालयातून प्राप्त होत आहे.त्यामुळे दुग्ध व्यावसायिक तरुण शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण सध्या दिसत आहे.
तालुक्यातील न्याहाळे,साकुर,डोंगरपाडा,वनवसी,पिंपळशेत आदी. परिसरातील तरुण शेतकरी पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात व शहरातील नागरिकांना दूध पुरवतात.मात्र पशुखाद्याच्या किमतीत झालेली वाढ,वाहतुकीसाठी लागणाऱ्या इंधनात झालेली भरमसाठ दरवाढ व दूध विकून मिळणारा मोबदला यातील तफावत वाढत गेली.परिणामी हा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला.त्यामुळे अनेक दूध विक्रेत्यांनी व्यवसाय बंद केला.परंतु सध्या दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याने पुन्हा या व्यवसायाने गती प्राप्त केली आहे. म्हणूनच या भागातील तरुण शेतकरी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेऊन जातिवंत गाई व म्हशी शासकीय योजनेच्या अनुदान रुपात खरेदी करून चांगल्या प्रकारे दुग्ध व्यवसाय करून आपली प्रगती साधत आहेत.
