दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-पूर्णा-अकोला मार्गावरून पळविलेली ‘छपरा’ एक्सप्रेस व मुंबईसाठी गाडीची मागणी असतांना अडचणीची ठरणारी अमरावती-पुणे रेल्वे मंजूर करून या मार्गावरील प्रवाशांची बोळवण करण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाने केला आहे.या नवीन रेल्वेबाबत घोषणा झाल्यापासून प्रवाशांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
दोन दिवसांपूर्वी रेल्वे विभागाने अमरावती-अकोला-पूर्णा-परभणी-लातूर मार्गावरून पुण्यासाठी एक द्विसाप्ताहिक रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली आहे.आठवड्यातून शुक्रवार व रविवारी अमरावतीहून ही रेल्वे रात्री ७.५० वाजता सुटणार आहे.ही रेल्वे अकोला येथे रात्री ९.२० वाजता वसमतला रात्री १२ वाजता व परभणीला रात्री २.३५ वाजता पोहचणार आहे.पुढे लातूर,उस्मानाबाद,दौंड मार्गे ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.२० वाजता पुण्याला पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासात पुण्याहून रात्री अकराच्या सुमारास निघून सकाळी ९.३८ वाजता परभणी,११.५४ वाजता हिंगोली,दुपारी तीनच्या सुमारास अकोला व सायंकाळी ५.३० वाजता अमरावतीला पोहोचणार आहे.
दोन्ही बाजूने निघण्याच्या वेळा व दोन्ही ठिकाणी पोहोचण्याच्या वेळा तर अडचणीच्या आहेतच.शिवाय अकोला,वाशिम,हिंगोली,परभणी जिल्ह्यातील प्रवाशांना या गाडीचा काडीमात्र उपयोग होणार नाही,अशी परिस्थिती आहे.अमरावतीहून पुण्यापर्यंत ८२२ कि.मी.चा वळसा घेऊन साडे अकरा तासांनी पोहोचणाऱ्या या सुपरफास्ट रेल्वेची स्पीड दर तासाला ४४.४३ कि.मी.असल्याचे रेल्वे विभागनेच कळविले आहे.पुणे किंवा अमरावती सारख्या शहरांना जाणारे प्रवासी सहसा व्यापारी किंवा शासकीय कामानिमित्त जाणारे असतात.दोन्ही शहरांना पोहोचण्याची वेळ सायंकाळची असल्याने अशा प्रवाशांना या रेल्वेचा फारसा उपयोग होईल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.यापूर्वी मुंबईसाठी चालणाऱ्या अजनी- कुर्ला रेल्वेचा झाला तसेच या रेल्वेचाही फियास्को होईल,अशी भिती जाणकारांतून व्यक्त होत आहे.या तात्कालिक रेल्वेला प्रवासी कमी मिळाले की ही बंद होईल आणि पुन्हा कधी या मार्गावर रेल्वे मिळणार नाही,या भितीपोटी ही रेल्वेच नको,अशी सर्वांची भावना होत आहे.
—————————————-
चुकीच्या वेळापत्रकामुळे रेल्वे रिकामी धावण्याची भिती
अमरावती,अकोला,वाशिम,हिंगोली व परभणी या सर्व पूर्णा-अकोला शहरांतून जवळपास ७० ते ८० खासगी ट्रॅव्हल्स बसेस पुण्यासाठी दरदिवशी धावत असतात.अकोला,वाशिम,हिंगोली या शहरांतून रात्री ८ ते १२ वाजेदरम्यान निघणाऱ्या ट्रॅव्हल्स् पहाटे ७ वाजेपर्यंत पुण्याला पोहचत असतात.उशिरा निघून लवकर पोहचण्याची ही सुविधा उपलब्ध असतांना लवकर निघून उशिरा पोहचण्याचा त्रास प्रवासी घेणार का,याबाबत शंका उपस्थित होत आहे.या सर्व ट्रॅव्हल्समधून प्रवाशी निघून जात असतील तर रात्री उशिरा येणाऱ्या रेल्वेमध्ये केवळ फुकट किंवा सवलतीच्या दरात प्रवास करणारेच दिसतील,असे जानकारांचे मत आहे.
—————————————-
