
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रोजगाराचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या विविध मागण्याकरिता सोमवारपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन आजही तसेच सुरूच होते.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ पासून लागू झाल्यानंतर गावपातळीवर ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली.या ग्रामरोजगार सेवकांना मिळणाऱ्या तुटपुंज मानधनावर आजी काम करावे लागत असल्याने ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या संघटनेमार्फत संबंधित विभागास पत्र देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर सोमवारपासून आपले काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसून सुरुवात केली आहे.
२०११ च्या शासन निर्णयात सुधारणा करून पूर्ण वेळ करण्यात यावी,शासकीय सेवेत समाविष्ट करावे,किमान वेतन कायद्या अंतर्गत मासिक वेतन थेट खात्यावर जमा करावे,NMMS अंतर्गत ऑनलाइन हजेरी तात्काळ बंद करून ऑफलाईन करण्यात यावी,विमा संरक्षण मिळावे अशा विविध मागण्या करिता त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेले आहे.त्याचप्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हजारो लोकांच्या हाताला काम देणारे पर्यायाने स्थलांतर रोखण्यासाठी मदत करणारे ग्रामरोजगार सेवकांना मिळणाऱ्या अल्प मानधनावर समाधान मानावे लागत असल्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर सध्याच्या परिस्थितीत उभा आहे.
रोजगार हमी योजनांनच्या कामाच्या अंमलबजावणीसाठी हे ग्रामरोजगार सेवकाचे पद शासनाने अमलात आणलेले असून लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.अंदाजपत्रके तयार करण्यापासून ते काम सुरू करणे तसेच हजेरी पत्रक पूर्णतः भरून मजुरी अदा करणे अशी कामे ग्राम रोजगार सेवकांना करावी लागतात.याचा मोबदला म्हणून ग्रामरोजगार सेवकांना एकूण रकमेच्या सव्वादोन टक्के मानधन म्हणून त्यांना दिली जाते.त्यांना मिळणाऱ्या ह्या मानधनावर आपला संसार चालवणे सध्याच्या महागाईच्या काळात कठीण होऊन बसले आहे.पर्यायाने विविध मागण्यांकरिता त्यांनी संपूर्ण जिल्ह्याभर काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.