
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-जून ते ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामासाठी सावकारांकडून उसने पैसे घेतले होते.घेतलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी पैसे नसल्याने अनेकदा बळीराजाला हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे;परंतु शासनाकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने संतप्त धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकरी वर्ग अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यास उतरले.
दिवाळीपूर्वी जुना धामणगाव,चांदुर रेल्वे,दाभा,लोणी,माहुली चोर व धानोरा गुरव मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल व अपप्रचाराला शेतकऱ्यांनी बळी पडू नये;विरोधक राजकारण करत आहेत असे वक्तव्य स्थानिक आमदार प्रताप अडसड यांनी केले होते.मात्र आता पुढच्या दिवाळीला पैसे मिळणार का?अशी विचारणा आता तालुक्यातील शेतकरी वर्ग करू लागली आहे.
आंदोलन दरम्यान माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी तहसीलदार प्रदीप शेलार यांच्यासोबत चर्चा केली असता तहसीलदारांनी नुकसान भरपाई रकमेची मागणी शासनाकडे प्रलंबित असल्याचे लेखी स्वरूपात दिले.