
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी – नवनाथ यादव
अवघ्या ६ दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने आष्टा, शेकापुर, वांगी परिसरात खळबळ.
भूम :- परंडा- वारदवाडी रोड लगत असलेल्या शेकापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेला ज्वारीच्या शेतात एक जिवंत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरील प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वांगी येथील महादेव वाघमारे हे मोटार सायकल वरून गावी जात होते. ते शेकापूर फाटा येथे आले असता त्यांना शेकापुर शिवारातील सुमन मारूती लोखंडे आष्टा यांच्या गट नं २७२ या ज्वारीच्या शेतातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी लगेच परंडा पोलिसांना कॉल केला. यावेळी कर्तव्यावर असलेले परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सुशील कोळेकर व सम्राट माने लागलीच ६:४५ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले.तेंव्हा ज्वारीच्या शेतात चार ते पाच दिवसापुर्वी जन्म झालेले जिवंत पुरुष जातीचे अर्भक आढळले.यांनी बाळाला ताब्यात घेऊन भूमचे ग्रामीण रुग्णालय गाठले.याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूळ यांनी प्रकृतीची तपासणी करून बाळावर प्राथमिक उपचार केले. यावेळी खबरदारीसाठी या बाळास उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले.१०८ रुग्ण वाहिकामध्ये समजसेवक विठ्ठल बाराते ,अभिजित काकडे व मित्र यांनी बाळ घेऊन गेले. या घटनेमुळे सर्वत्र हाळ हळ व्यक्त होत आहे.तरी सदर नवजात बालकांची पालक, नातेवाईक संबधी याबाबत माहीती मिळून आल्यास पोलीस ठाणे परंडा येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक एस बी गिडडे यांनी केले आहे. तर तपास पोलिस अधिकारी बी आर काकडे करत आहेत.