
दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक – दत्तात्रय कराळे
परभणी : शहर किंवा जिल्हा परिसरातील वाहने विशेषतः दुचाकी अत्यंत भरधाव वेगाने धावतांना आढळतात. संबंधित वाहन धारक वाहतूक नियमांची, कायद्याची पायमल्ली करीत असतात. वाहतूक कायद्याची धजिय्या उडवताना आढळून येत असते. प्रसंगी पोलिसांना सुध्दा किंमत देत नसतात. अशा मग्रुर चालकांचे वाहनांवर कोणतेही नियंत्रण नसते. त्याचाच परिपाक म्हणून मागील अनेक दिवसांपासून अपघातांची व त्यात बळी पडलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. कधी कधी तर नियंत्रण न ठेवणारे तसे वाहन धारक ही मृत्यूचे शिकार बनले गेल्याचे सर्वश्रुत आहे. यांचे मुख्य कारण म्हणजे परभणी शहरातील वा बाहेरील कोणत्याही वाहनांच्या वेगावर पोलिसांचे अक्षम्य दूर्लक्ष होत असते. वाहतुकीचे नियम व वेग नियंत्रण पूर्णपणे धाब्यावर बसवून कायदाच टांगणीला लावू पाहाणाऱ्या अशा मस्तवाल वाहनधारकांना वेळीच कायद्याचा इंगा दाखवला गेला असता तर अनेकांचे जीव वाचले गेले असते. नव्हे हे वास्तव आहे. त्यात कित्येक वाहनधारकही वाचले गेले असते.
नियमबाह्य किंवा अन्य मार्गाने विनाकारण वसूली केली जाते असा धादांत खोटा आरोप पोलिसांवर लावून त्यांना जाणीव पूर्वक बदनामही केले जात असल्याचे अनेकदा ऐकावयास मिळते. तथापि अशा कोणत्याही खोट्या आरोपांना न घाबरता कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांनी भरधाव वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक वाहनांना वेग नियंत्रक बसवावा लागला तरी हरकत नाही. प्रसंगी त्यांचेही उल्लंघन होत असेल तर तशा मस्तवाल वाहनधारकांच्या मुसक्या आवळून त्याला मुंबई वाहतूक नियमानुसार कायद्याचा इंगा दाखवला गेल्यास नक्कीच त्याची मस्ती उतरली जाऊ शकेल यात शंकाच नसावी.
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून जो कोणी वाहनधारक भरधाव वेगाने वाहन चालवेल, त्यांच्या वाहनाखाली एखादा नागरिक सापडला गेला अन् त्याचे काही तरी बरे वाईट झाले तर त्या घटनेला त्यालाच जबाबदार धरले गेल्यास अशा प्रकारे होणारे अपघात टाळू शकतील. जर त्या अपघातात जखमी होणारा इसम जो कोणी असेल तो जर त्या वाहनधारकाचा किंवा वाहतूक पोलिसांचा कोणी नातेवाईक, आप्तेष्ट असेल तर त्यापैकी कोणीही बघत बसणार आहेत का ? त्यांना त्या दु:खाणी झळ बसणार नाही का ? दुर्दैवाने अशी पाळी कोणावरही येता कामा नये यासाठी पोलिसांनी ही कायद्याचा कठोर अंमल करावा आणि कायद्याचा बडगा उगारला जाऊ नये यासाठी आपणही कधीही व कोणाचाही अपघात घडणार नाही याची दक्षता घेणे प्रत्येक वाहनधारकाचे कर्तव्य राहिले जाणे महत्वाचे आहे.
शहरात व जिल्हा परिसरात कुठेही आणि कोणाचेही अपघात घडले जाऊ नयेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे व त्यासंबंधीचे सख्त आदेश सर्व पोलीस विभागांना देणे गरजेचे ठरणार आहे. तसे न केल्यास वाहनधारकांच्या मस्तानीच्या वाढीस लागला जाईल. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याशिवाय राहाणारे नाही. त्याचाच परिपाक म्हणून कित्येकांच्या घरांवर, परिवारावर संकट कोसळले जाईल. कित्येक आया-भगिनींना वैधव्याचं शिकार बनावं लागणार आहे. त्यांचं कुंकू वाचवायचं हे पोलिसांच्याच हातात असून बेफाम वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांना वेळीच आवर घालावा तर आणि तरच अशा प्रकारच्या अपघातांना आळा बसू शकेल. कट्टू आहे पण सत्य आहे. वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. कठोर कायदा व त्यांच्या अंमलबजावणीचा प्रारंभी होणारा त्रास कालांतराने मानवी मूल्य जपणारा ठरु शकेल यात शंकाच नसावी.