
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/गंगाखेड :
गंगाखेडहून चाकूरकडे सहलीला जाणारी शालेय बस आणि राज्य परिवहन विभागाची बस यांची समोरा समोर जबरी टक्कर होऊन त्यात दोन्ही वाहनांमधील २२ जण जखमी झाले आहेत. आज म्हणजेच रविवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान गंगाखेड-रानी सावरगाव रोडवरील खंडाळी गावा दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार चालू असल्याचे समजते.
गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाची बस विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी चाकूरकडे निघाली होती. तालुक्यातील खंडाळी गावाजवळ शाळेची बस आली असता अहमदपूरहून बुलढाण्यात डे जाणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बसची समोरासमोर जबरी धडक बसली. या अपघातात विद्यार्थी व प्रवासी मिळून एकूण २२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंढे, डॉ. स्वाती मुंढे, डॉ. केशव मुंढे, डॉ. योगेश मल्लूरवार, डॉ. कैलास बांदेकर आदीच्या पथकाने तातडीने उपचार करुन त्या सर्वांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान सहा जणांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी परभणीत आणले आहे. शालेय बस व एसटी बसची समोरासमोर धडक झाल्यामुळे सदर बसचा चालक कॅबीनमध्येच (अटकून) रुतून बसला होता. पोलीस आणि प्रवासी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्याला बाहेर काढण्यात यश मिळविले. त्याची प्रकृती सुध्दा गंभीर असल्याने त्यालाही परभणीत हलविल्याचे समजतेय.
या अपघाताची खबर मिळताच पिंपळदरी येथील पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. घटनास्थळी येताच अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पोलीस पथकाने सर्वोतोपरी सहकार्य केले. या पोलीस पथकात सपोनि. व्ही. एच्. मराठे, उपोनि. डोंगरे, सपोउपनि. शिनगारे, कराळे, पो.ह. देशमुख आणि पो.कर्मचारी पांढरे आदींचा समावेश होता.