
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : महापालिका क्षेत्रातील ज्या ज्या निवासी मालमत्तांचा वापर व्यवसायासाठी केला जात आहे अशा सर्व मालमत्तांना मागील कालावधीपासून सर्व प्रकारचा कर आकारला जाऊन त्या करांची वसूली थकबाकीदार म्हणून सक्तीने केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिला असून त्या साठी मनपातील अधिकाऱ्यांचं एक प्रबळ असे वसूली पथक तैनात करण्यात आल्याचेही सौ. सांडभोर यांनी सांगितलं आहे.
शहरांमध्ये अनेकजणांनी आपल्या राहात्या घरातच तसेच निवासी मालमत्तेत मोठ्या प्रमाणात खासगी व्यवसाय सुरु केले आहेत. त्याशिवाय अनेक निवासी मालमत्ता खासगी तथा शासकीय, निमशासकीय कार्यालये अथवा कामकाजासाठी भाड्याने दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या मालकांचा आर्थिक स्त्रोत उंचावला जाणे स्वाभाविक आहे. त्या माध्यमातून त्या निवासी मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात स्वतःचा आर्थिक फायदा करुनही घेतला आहे. तथापि त्यांच्या या कृतीमुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. महापालिकेला भरणे आवश्यक असलेला वाणिज्य कर, जो व्यवसायिक रुपाने वसूल केला जाणे आवश्यक असतो, तो बुडविला जातो. व्यावसायिक पध्दतीने आकारली जाणारी कराची आकारणी, नळपट्टी त्या तुलनेत वसूल करणे आवश्यक असलेली जीएसटी सुध्दा बुडविली जात आहे. अनेक नागरिकांनी आपल्या मोकळ्या जागेत वा निवासी जागेत दुकाने, गाळ्यांची निर्मिती केली असून ती परस्पर ग्राहकांना चढ्या दराने वैयक्तिक कराराद्वारे भाड्याने दिल्याचे आढळून आले आहे. तथापि तशा मालमत्तांची वाणिज्य स्वरुपाची कोणतीही नोंद महापालिका दफ्तरी नसल्याचे दिसून आले आहे. त्या सर्व निवासी मालमत्ता वाणिज्यिक नोंद करुन घेणे आवश्यक आहे. या व अशा स्वरुपाच्या कृत्याबाबत संबंधितांविरुध्द कठोर कारवाईचा बडगा ही उचलला जाऊ शकतो. त्याशिवाय सदरची मालमत्ता बांधलेला कालावधी, परस्पर वाणिज्यिक भाड्याने दिलेल्या कालावधी तपासून तेव्हापासूनचा कर, दंड आणि फसवणूकीबाबतचा अधिक दंड सक्तीने वसूल केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दुकाने, गाळे किंवा वाणिज्यिक मालमत्तांना आकारला जाणारा नळपट्टी करही तेव्हापासून वसूल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेच्या पथकाने थकित असलेली निवासी मालमत्ता कराची वसूली सुरु केली आहे. कर थकीत मालमत्तांची तपासणी केली असता बहुतांश मालमत्ता या वैयक्तिक करारान्वये व्यावसायिक भाड्याने दिल्याचे आढळून आले आहे. अशा मालमत्ता धारकांनी आपला आर्थिक फायदा साधतांना महापालिका कराचा ही विचार करणे आवश्यक होते परंतु तसे कुठंही झाल्याचे आढळून आले नाही. परिणामी महापालिकेचा आर्थिक स्त्रोत कमालिचा घसरला गेला आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण ७५ हजार मालमत्ता दफ्तरी नोंद असल्या तरी त्याची घरपट्टी भरणा करण्याची तसदी मात्र कोणीच घेत नसल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षांपर्यंतचा येणे अपेक्षित असलेला घरपट्टीचा कर कोट्यावधींच्या घरात आहे. या वर्षीचा तर बाकीच राहाणार आहे. घरपट्टी व पाणीपट्टी या दोन्हींची मिळून एकूण ६७ ते ६८ कोटींच्या घरात थकबाकी असल्याचे समजते. महापालिकेकडून सोयी सुविधांची अपेक्षा ठेवणाऱ्या नागरिकांनी आपली नैतिक जबाबदारी सुध्दा सांभाळणे गरजेचे नाही का ? एका बाजूला महापालिकेच्या विरोधात ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूला कोट्यावधींची कर भरणा करण्याऐवजी थकबाकी ठेवायची, नैतिक मूल्यांचे अधिपतन करण्यासारखाच हा अजब प्रकार अआहे असं म्हटलं तर चुकीचे ठरु नये.
कर भरणा, मग तो कोणताही असो. वेळेच्या वेळी व नियमितपणे भरणे हा मानवीय धर्म आहे. कर भरला आणि महापालिकेचा आर्थिक स्त्रोत वाढीस लावला तर आणि तरच आपल्या हक्काच्या मुलभूत सोयी सुविधा पुरविणे शक्य होईल अन्यथा ते कष्टप्राय नव्हे नव्हे महत्प्रयासीच ठरु शकेल यात शंकाच नाही. कराचा वेळेवर भरणा न केला गेल्यास महापालिकेला वसूली साठी कारवाईचा बडगा उचलल्याशिवाय पर्यायच नाही. कठोर कारवाई, प्रसंगी गुन्हेही दाखल करणे भाग पडू शकते. ठराविक रकमेनंतर वीज बील वेळेत भरणा न केल्यास थेट वीज प्रवाह बंद केला जातो किंवा वीज मीटर काढून नेले जातातच ना ? मग पाणी पट्टी वेळेवर न भरली गेल्यास पाण्याचेही कनेक्शन बंद करावे लागले किंवा घरपट्टी थकीत असूनही ती न भरली गेल्यास मालमत्ता सीज केली गेली तर त्यात आश्चर्य ते कसले ? ही प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी असू शकते, असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही. महापालिकेने या वसूलीसाठी सशक्त अधिकाऱ्यांचं एक पथक तैनात केलं आहे. त्यांच्या कारवाईची वाट न बघता किंवा महापालिकेच्या कठोर निर्णयाप्रत न थांबता प्रत्येकाने वेळीच थकीत कराचा भरणा केला तर महापालिकेला ही बळकटी मिळू शकेल यात शंकाच नाही. कायद्यापुढे सर्व सामान असून कोण लहान अथवा कोण मोठा याचाही भेदभाव करणे अशा प्रणाली मध्ये एखाद्या अधिकाऱ्याला शक्य नसते. तेव्हा भरणा करा अन्यथा कठोर कारवाईला सज्ज व्हा, नव्हे हा मनपाचा दंडक राहिला जाणार आहे एवढे नक्की.