
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पालम : तालुक्यातील वीज महावितरण मंडळातर्फे शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक केली जात आहे. त्यांच्या या मनमानीचा व दडपशाहीचा जबरी फटका पालम तालुक्यातील समस्त शेतकरी व कष्टकऱ्यांना बसला जात आहे. नियमित व मुबलक अशी वीज पुरवठा करणे हे वितरणाचे कर्तव्य आहे, नव्हे तो शेतकऱ्यांचा हक्कच आहे. पालमच्या ग्रामीण भागात एकूण ४८ तासांपैकी केवळ आणि केवळ सहा तासच वीज पुरवठा करुन शेतकरी वर्गाची पिळवणूक केली जात आहे. परिणामी शेतीमधील उभी पिकं जळून जात आहेत. हातात तोंडाशी आलेली रब्बीची पिके माना टाकून करपली जात आहेत. अगोदरच नानाविध संकटांपासून पूरता मेटाकुटीला आलेला शेतकरी अपुऱ्या वीजेअभावी पुन्हा हेतूपुरस्सर नागवण्याचे महापातक वीज वितरण व अधिकारी करणार असतील आणि किमान १२ तास वीज पुरवठा करणारे नसतील तर प्रखर जनांदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांनी पंगा घेऊ पहाणाऱ्या अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा उतरवायला वेळ लागणार नाही. नव्हे नव्हे त्यांना पळता भूई थोडी करुन टाकल्याशिवाय राहाणार नाही, असा घणाघाती आरोप करीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी चक्क निर्वाणीचा इशाराच दिला आहे.
मागील काही कालावधीपासून पालम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वीज समस्या कमालीच्या वाढल्या आहेत. विहिरी व बोअरला पिके भिजवण्यासाठी भरपूर पाणी असूनही वीजेअभावी ते देणे तथा पिके भिजविणे कष्टप्राय बनले जात आहे. हातात तोंडाशी आलेली पिके माना टाकून करपली जात आहेत. एकापाठोपाठ एक अशा नैसर्गिक संकटांमुळे अगोदरच शेतकरी, कष्टकरी पूरता मेटाकुटीला आलेला आहे. हवालदिल झाला आहे. अर्ज विनंत्या करुन किंवा प्रत्यक्ष भेटूनही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना मुळीच दाद देत नाहीत. हातात तोंडाशी आलेली पिके वीज पुरवठ्या अभावी वाया जात आहेत या भीतीने तालुक्यातील त्रस्त शेतकरी पालक असलेल्या आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना साकडे घालून दिवसेंदिवस आपल्या व्यथा मांडत आहेत. त्याचाच परिपाक म्हणून गावागावांतील प्रमुख कार्यकर्त्यांसह रासपचे मान्यवर पदाधिकारी यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या तर मांडल्या आहेतच शिवाय तालुक्याचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून इशारा वजा त्यांचाही निरोप या शिष्टमंडळाने कानी घातल्याचे समजते. आगामी आठ दिवसांत वीज समस्या सोडवून पुरवठा सुरळीत चालू ठेवावा असा अल्टीमेटमही दिल्याचे समजते. तथापि अधिकाऱ्यांनी कोणतीही सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून न आल्यामुळेच आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी हा निर्वाणीचा इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
या इशाऱ्यानंतरही वीज अधिकारी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करतील का आपला मस्तवाली हट्ट कायम ठेवतील हे दिसून येणारच आहे. तथापि लोकप्रतिनिधींच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचे काम लोकसेवक पदी कार्यरत अधिकारी जर लावणार असतील तर आणि तर आमदार म्हणून डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिलेला इशारा योग्य असाच म्हणावा लागेल. ज्या शेतकऱ्यांच्या मतांवर डॉ. रत्नाकर गुट्टे हे आमदार झाले आहेत, त्यांच्यासाठी धावून जाणे व शेतकरी मतदारांच्या समस्या मार्गी लावणे हे कर्तव्यच राहाणार आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी व शेतकऱ्यांची वाया जाणारी पिकं वाचविण्यासाठी आमदार म्हणून डॉ. गुट्टे यांची प्रतिष्ठा पूरती पणाला लागली जाणार आहे एवढे नक्की.