
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पूर्णा : तालुक्यातील आवई गावपरिसरात खुलेआम आकडे टाकून वीज चोरी केली जात आहे. केबल द्वारा होणाऱ्या अशा प्रकारच्या वीज चोरीची भणक लागताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेले व त्यांनी तेथे वीज चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले. त्यांचा राग येवून अधिकारी व पथकावर उपसरपंचासह अन्य नागरिकांनी जबरी हल्ला केल्याचे बोलले जात आहे. संबंधित अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्यांना जमीनीवर ढकलून दिले. अर्वाच्य शिवीगाळ केली. अपमानजनक वागणूक दिल्याचे समजते. त्याचाच परिपाक म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्णा पोलिसांत जाऊन लिप्त लोकांविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.
मागील अनेक दिवसांपासून पूर्णा तालुक्यात अशा प्रकारची वीजचोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. केबल द्वारा आकडे टाकून होणाऱ्या वीज चोरीचा महावितरणलाच मोठा फटका बसला जात आहे. अशा वीज चोरीला आळा बसला जावा आणि संबंधितांवर कारवाईचा बडगा उचलला जावा असे निर्देश वरिष्ठांकडून असल्याने महावितरण पूर्णा ग्रामीण -१ चे सहाय्यक अभियंता प्रीतम वसमतकर यांनी आपले सहकारी उप कार्यकारी अभियंता श्याम खोडपे, सहाय्यक अभियंता पंडित राठोड, बालाजी खिल्लारे, वैभव लटपटे, बालाजी मोरे, गजानन काळे, शेख नूरबाशा, शेख अमजद, नवनाथ कोरेबेनवाड हे सर्वजण आली परिसरात कारवाई साठी गेले होते. कालवा परिसरात विजेच्या खांबावर बेकायदेशीर आकडे टाकून वीज चोरी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने घटनास्थळावरुन केबल, स्टार्टर आदी साहित्य जप्त केले. तेवढ्यात राजू सोनवणे, उपसरपंच लक्ष्मण बुडाले हे हातात काठ्या घेऊन आले. त्यांनी सहाय्यक अभियंता वसमतकर यांना अडवून बऱ्या बोलावे साहित्य द्या अन्यथा परिणाम वाईट होतील म्हणून वाद घालायला सुरुवात करुन थेट शिवीगाळ सुरु केली तर उपसरपंच लक्ष्मण बुडाले यांनी वसमतकर यांच्या शर्टाची कॉलर पकडून दमदाटी करत त्यांना थेट जमिनीवरच ढकलून दिले. उपकार्यकारी अभियंता गोगटे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दमदाटी करण्यात आली. एवढेंच नाही तर जप्त केलेले साहित्य सुध्दा खेचून परत घेतले.
शासकीय कामात अडथळा आणला म्हणून सहायक अभियंता प्रीतम वसमतकर यांनी पूर्णा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून राजू सोनावणे, उपसरपंच लक्ष्मण बुडाले यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे समजते. एकूणच या प्रकरणामुळे वीज अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मोठे भीतीचे सावट असल्याचे बोलले जात आहे.