
दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक- दत्तात्रय कराळे
एके काळचे प्रख्यात असे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले आणि नवसाला पावणारे, हजारो लोकांचे श्रध्दास्थान म्हणून सर्वदूर परिचित असलेले ‘(परत गंगा)’ ‘अंतेश्वर’ या स्थानाचे “तीर्थक्षेत्रीय गतवैभव” पुन:स्थापित करावे अशी मागणी भूमीपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वामनराव कराळे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील व लोहा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावरील गाव म्हणजे अंतेश्वर. महाराष्ट्र राज्याची प्रमुख नदी गोदावरीच्या काठावर वसलेले हे गाव. पूर्वापार चालत आलेली येथील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा सर्वदूर परिचित आहे. नदीकाठावरील अंतेश्वर नगरीच्या सभोवताली असलेला तिन्ही भागाचा बहुतांश परिघ हा परभणी जिल्ह्यात मोडत आहे. नदीच्या पलिकडील बाजूला म्हणजेच पूर्वेला उदासी ऋषी महाराजांचा आश्रम आहे. पावसाळ्यात दुथडी भरुन वाहिले जाणाऱ्या नदी पात्रातील पाण्यामुळे त्या गावाला व नागरिकांना कोणताही धोका होऊ नये यासाठी शासनाने नदीकाठावरील बहुतांश गावे अन्यत्र स्थलांतरित केली आहेत. त्याचाच परिपाक म्हणून लहान पेनूर मूळ जागेवरुन उठवून ते उदासी ऋषी आश्रम परिसरात स्थलांतरीत केले आहे तर दुसरीकडे एकदम काठावरील सातेफळ व रुंज ही दोन्ही गावे नदी पात्रापासून काही अंतरावर स्थायिक केले. उदासी ऋषी आश्रम परिसरातील नदीच्या काठावर परभणी शहरातील एका मोठ्या दानशूर व्यापारी व्यक्तीने माझ्या लहानपणीच मला मोठा घाट बांधला आहे. असं म्हणतात की, त्या व्यक्तीला मुलं होत नसल्याने नदीला नवस केला होता. बुधवार-गुरुवार अशी दोन दिवशीय अमावास्या आली त्यावेळी या नदी स्थानावर दोन्ही बाजूने भाविक-भक्तांची मोठी यात्रा भरत असते. आजही ती प्रचलित पध्दती कांहीं अंशी का होईना परंतु चालू असते. बोललेला नवस पूर्ण झाला, परिवारात वारस झाला म्हणून आनंदी त्या व्यापाऱ्याने गंगेच्या नवसाला पावलेल्या त्या मुलाचे नाव ‘गंगाधर’ असे ठेवल्याचे बोलले जातेय. व्यापाऱ्याने बांधलेला तो घाट आजही वापरात असल्याचे बघावयास मिळतोय. हे श्रध्दास्थान व हा संपूर्ण परिघ पूर्वी वसमत तालुक्यात गणला जायचा. परंतु तो आता भौगोलिक परिस्थिती बदलल्यामुळे नव्याने निर्मित पूर्णा तालुक्यात समाविष्ट करण्यात आला आहे. पश्चिम आणि उत्तरेला असणारा नदीच्या दोन्हीकडील संपूर्ण परिघ हा सुध्दा परभणी जिल्ह्यातील नवनिर्मित पालम तालुक्यात येत आहे. पूर्वी हा भाग गंगाखेड तालुक्यात मोडत होता. तेथेही भौगोलिक स्थितीत बदल झाला असल्याने वाढती लोकसंख्या आणि विकासात्मक दृष्टीने लहान लहान तालुके निर्मिती धोरण योग्य राहिले या दृष्टीने सरकारने ते धोरण अवलंबले आहे. या परिसरातील नदी काठावर वसलेले पूर्वीचे सारंगी, वाणी पिंपळगाव, राहाटी, दुटका व अन्य काही गावे अन्यत्र स्थलांतरीत करुन पुरापासून होणारा धोका टाळला आहे. शासनाने त्यांना जमीनीसह अन्य सुविधा सुध्दा पुरविल्या आहेत. इकडे नांदेड जिल्हा व लोहा तालुका परिक्षेत्रातील आणि अंतेश्वर परिघातील भारस्वाडा, चित्रावाडी व मोठे पेनूरसह अन्य जी जी धोकादायक अशी परिस्थिती आहे अशी सर्व गावे शासनाने अन्यत्र स्थलांतरित केली आहेत. नदी काठचे पावित्र्य महत्वाचे असले तरी मानवीय जीव आणि गाव वाचविला जाणे महत्त्वाचे समजून नदीच्या त्या पावित्र्याच्या सानिध्यातचती गावे स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला त्या त्या गावांनी मान्य केला आहे.
नागमोडी विळखा घालून आपल्या काव्यात घेतलेल्या गोदावरी नदीने नैसर्गिक वातावरण कायम ठेवत अंतेश्वर नगरीला जे तीर्थक्षेत्रीय पावित्र्य उपलब्ध करुन दिले आहे ती एक परमेश्वरी अगाध लीलाच समजली पाहिजे. तेथे असलेले दक्षिण मुखी हनुमान मंदीर, श्री भोलेनाथ शंकराचे अनंत ऋषी मंदीर हे तेथील ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहेत. जगतगुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी सोहळ्याच्या औचित्यावर येणारा गुरुवर्य श्रीमद् शंकर भारती महाराज यांचा भव्य असा संजीवनी सोहळा याच पवित्र स्थानावर प्रतिवर्षी अगदी थाटात साजरा केला जातो. मोठं मोठे व नामांकित असे कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या अगाध अशा ज्ञानाचे भांडार उधळण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. उल्लेखनीय व सुप्रसिद्ध अशा धर्म ग्रंथांचे पारायण, भजन, कीर्तन आठ आठ दिवस सातत्याने या ठिकाणी आयोजित केले जाते. त्या निमित्ताने उपस्थित हजारो भाविक-भक्तांच्या मांदियाळीला सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तिन्ही समयी नास्ता व भोजनाची सोय या ठिकाणी विशेषत्वाने केली जाते. त्याशिवाय नित्य नियमाने पार पाडला जाणारा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. समस्त हरि भक्तांचे श्रध्दास्थान असलेले अंतेश्वर या ना त्या कारणांमुळे सतत गजबजलेले असते.
तथापि बुधवार-गुरुवारच्या अमावास्या मुहुर्तावर भरली जाणारी जत्रा (यात्रा) जी अंतेश्वर स्थानी अनंत काळापासून सुरु होती, ती मात्र आता भरली जात नाही, याचे शल्य मात्र मनाला कुठे तरी वेदना देऊन जाते. लांबून लांबून येणारे भाविक भक्त नदी काठावर आपले सारे कुटुंब घेऊन श्रध्देने थांबत असत. सजवलेल्या बैलगाड्या, घोडा गाड्या, छकडे (लहान वाहने) हे त्या काळचे आकर्षण ठरले जायचे. चंद्रभागेच्या तीरी पसरलेला भक्तांचा समुदाय जसा विखुरलेला दिसून येतो अगदी तसाच तेथील भक्तांचा तां तां सुध्दा अंतेश्वरच्या नदी काठी वाळवंटात अगदी फुलून दिसायचा. कधी हजारोंच्या तर कधी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तगणांमुळे दोन्ही बाजूंचा नदी काठ अगदी दूर दूर पर्यंत गजबजलेला दिसायचा. हजारो बैलगाड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वसूल होणारा महसूल ग्रामपंचायतीला मिळत असे. दोन बाय सहा इंचाच्या आकारातील कोऱ्या कागदाच्या पावत्यांवर ग्रामपंचायतींच्या नावाचा रबरी शिक्का मारुन तयार केल्या जाणाऱ्या त्या कर रुपी पावत्या ग्रामपंचायतींच्या वतीने बैलगाडीच्या जूवावर मध्यभागी चिटकवल्या जात असत. त्या पावत्या बनविण्याची जबाबदारी त्या काळी माझ्यावर सोपविली जायची. मी सुद्धा उत्साहाने पार पाडीत असे. ग्रा. पं. कार्यालयाची जबाबदारी त्या वेळी अगोदर किशनराव मास्तर यांच्याकडे बरीच वर्षे होती. नंतरच्या काळात जसे सरपंच बदलले जायचे तशी मानवीय व्यवस्था सुध्दा बदली होत असे.
जत्रेच्या निमित्ताने अंतेश्वर नगरीला जे महत्त्व प्राप्त झाले होते ते अनाकालनीय असेच होते. गोदावरी पात्रात भक्तीभावाने केले जाणारे स्नान, विविध देवी देवतांची विनम्रतेने केली जाणारी पूजा अर्चा फलदायी ठरली जायची. नदीपात्रात स्नान करताना भक्त गण कागदी दिवे तेलात किंवा तुपात वाती भिजवून प्रज्वलित करुन सोडत असत. पळसाच्या पानांचे व त्यात कणेरी किंवा अन्य फुलांचा समावेश असलेले गोपी पाळणे समस्त भक्तगण भक्तीभावाने नदीपात्रात सोडत असत. ज्यांना गोदामाईच्या नवसाने मुलं व्हायची ते भक्त, लाकडी, लोखंडी वा स्टीलची पाळणे सजवून सोडत असत. सजवलेल्या पाळण्यात बाळाला झोपवले जायचे, वाजंत्री वाजवली जायची, अगदी लग्न समारंभासारखे सर्व विधी व सोपस्कार केले जात असत. उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना नवीन कपड्यांचे आहेर चढविले जायचे. जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठायच्या. गाड्या-घोड्या सजवून आणल्या जायच्या. त्याच जत्रेत असंख्य अशी दुकाने थाटली जायची. त्यात पूजा-अर्चेला लागणारे साहित्य, विविध स्वरुपाची मिठाई, किराना सामान, कपडे, भांड्यांच्या मोठमोठ्या दुकानांचा समावेश असायचा. लहान लहान मुलांना आकर्षित करणारी विविध खेळण्यांची, सामानाची दुकाने, गोल गोल फिरणारी लाकडी घोड्यांची व आकाश पाळण्यांची रेलचेल, ऊस, संत्री, मोसंबी, अननस घ्या संरक्षणाची दुकाने, गरिबांचे टॉनिक म्हणून गणले जाणाऱ्या असंख्य चहाच्या टपऱ्या, लहान मुले श्रीमंतांचा संबोधला जाणारा चहा दूध मोठ्या प्रमाणात विकले जायचे. शेतीला लागणारी अवजारे, जनावरांना उपयुक्त साहित्य, मानवीय पायांना आवश्यक जोडे, चपला, बुट, महिलांच्या चपल्या, लहान मुलांसाठी निरनिराळे आवाज काढणारे रंगी बेरंगी बुट हौसेने खरेदी केले जायचे. कुरमुरे, बघताना, टिपरे, देवड्या, साधे व गोड फुटाणे प्रसाद म्हणून आवडीने खरेदी केले जात असत. निरनिराळ्या आवाजातील टुंड्रा, शिट्ट्या, हातात, गळ्यात बांधले जाणारे विविध रंगी दोरे आदींची दुकाने सुध्दा मोठ्या प्रमाणात असतं. अर्थात हा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक व प्रचलित चालणारा खजिना आता बऱ्याच अंशी लुप्त पावत चालल्याचे दिसून येत आहे. पाळण्याच्या व विविध कारणांसाठी येणारी वाजली जाणारी वाजंत्री, गजबजून टाकणारा मानवीय गोंगाट लक्षणीय असाच ठरला जायचा. असे हे सांस्कृतिक वैभव आता बघायला मिळत नाही.
अंतेश्वर नगरीला त्या काळी लाभलेले तीर्थक्षेत्रीय वैभव पुन: प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्या काळची धार्मिक व सांस्कृतिक ओळख न पुसली जाता या पुढील पिढ्यांना सुध्दा ती अवगत राहिली जावी ही प्रत्येकाचीच जबाबदारी राहाणे आवश्यक आहे. जत्रा भरुन शकेल अशी त्यासाठी पूर्वीसारखी नदीवरील रेती (वाळू) दिसणारी नसली तरी त्याला अन्य दुसरे अनेक पर्याय आहेत. नदीवर लांबच्या लांब घाट बांधून घेणे. माजी सरपंच स्व. बबनराव कराळे यांच्या घरापासून ते श्री हनुमानजी घ्या मंदीरापर्यंत दगडी असो वा सिमेंट कॉंक्रीटचा उंच पूल बनवून त्याला सुध्दा नदीच्या दिशेकडे घाटासारख्या पायऱ्या बनविणे. श्री मरीआई मंदीराचा सभोवतालचा भाग व डाव्या बाजूस नदीकडील सर्व भाग सुधारित करुन घेतल्यास त्या ठिकाणी सुध्दा मोठ्या प्रमाणात जत्रा भरुन शकेल. बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी निरनिराळी दुकाने त्या परिसरात थाटली गेल्यास भक्तांच्या खरेदीची सोय तर होऊ शकले आणि ग्रामपंचायतीच्या महसूलातही बऱ्यापैकी वाढ होऊ शकेल. त्याशिवाय भक्तांची संख्या व श्रद्धा वाढीस लागून जत्रेचंही स्वरुप आपोआप मोठ्या प्रमाणात वाढलं जाईल. ज्यामुळे अंतेश्वरचं तीर्थक्षेत्र हे पुन: प्रस्थापित होऊन गत वैभव निश्चितच प्राप्त होऊ शकेल यात शंकाच नाही.
गावोगावी नागरी विकास वाढीस लागत आहे. गावात व परिसरात सर्वत्र धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिकाधिक वाव दिला जात आहे. मंदीर व परिसर आधुनिक पध्दतीने सुधारला जात आहे. नवनवीन योजना आणल्या जात आहेत. मग आपल्या गावातच तसं का केलं जावू नये, यांचाही प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे. आपल्या गावाचं नाव रोशन करणं, त्यांची महती सर्वत्र विखुरली जाईल यासाठी प्रत्येकाचा हातभार लागणे हे महत्त्वाचे नाही का वाटत ? तर मग चला, आजच निर्धार करुया, आणि अंतेश्वर नाही तर तीर्थक्षेत्र अंतेश्वर बनवून त्याची महती सगळीकडे पसरवूया . तर आणि तरच प्रत्येकाचं स्वप्न पूर्णत्वास जाऊ शकेल असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे.