
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पूर्णा : मागील अनेक दिवसांपासून कमी वीज पुरवठा होत असल्याने आवईच्या असंख्य त्रस्त ग्रामस्थांनी वारंवार अर्ज विनंत्या केल्या तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पाणी असून तसेच आम्ही वीज वितरण मंडळाचे अधिकृत खातेदार असूनही जाणीवपूर्वक अनियमित व अपूरा वीज पुरवठा केला जात आहे. परिणामी हातात तोंडाशी आलेली पिके जळून जातील या भीतीने भयभीत शेतकऱ्यांनी महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मस्तवाल पणा अधिकच वाढीस लागल्याच्या तक्रारींचा पाढा असंख्य शेतकऱ्यांनी पूर्णा तहसीलदारांना दिलेल्या तक्रारीत कथन केला आहे. आमच्या विरुद्ध तक्रारी का करताय, आम्हीच सर्वेसर्वा असल्याने तुम्ही आमचे काहीच करु शकणार नाही. अशी दमबाजी बाजी करत सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमच्या महिलांकडे जो उध्दटपणा केला आहे, तो अत्यंत निंदनीय असाच असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार व पूर्णा पोलिसांकडे कथन केला आहे.
सरकारी असल्याची घमेंड या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नसानसात भिनली असल्याने शेतकरी व कष्टकरी यांच्याबद्दल त्यांना मुळीच मानमरातब राहिला नसून माय माऊल्यांबरोबर कसं बोलावं एवढीही त्यांना अक्कल नसून कमालीची घमेंड घडल्याचा हा परिपाक दिसून येतो आहे असेही नागरिकांनी आपला त्रागा व्यक्त करतांना म्हटले आहे.
माझं असावा, आपल्या कामाचा, शेतकरी वर्गाच्या सेवेचा परंतु मस्तवालपणा मुळीच नसावा असेही अनेक ज्येष्ठ नागरिक बोलत होते. अधिकृत खातेदार असलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारी काढून नेणे, त्यांच्या वायरी चोरुन नेणे, कनेक्शन कट करणे व कोणत्या ना कोणत्या कारणाने मुद्दाम राग काढून चोरीसारखा मुजोरपणा करणे, शासन सेवेतील अधिकारी असो वा कर्मचारी यांना मुळीच शोभणारे नाही असेही नागरिक संतापाने म्हणत होते.
या प्रकरणी माननीय तहसीलदार व पोलीस खात्याने चौकशी करुन शेतकरी, कष्टकरी व महिलांना न्याय द्यावा आणि यात दोषी असणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावा असेही नागरिकांनी तहसीलदार व पोलीसांना साकडे घातले आहे. तसे झाल्यास दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाईल यात शंकाच नसावी.