
दैनिक चालू वार्ता जळगाव जामोद/प्रतिनिधी:-
खांडवी येथे दिनांक 13 डिसेंबरच्या मध्यरात्री पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय राऊत पोलीस शिपाई सुनील वावगे पोलीस कॉन्स्टेबल डब्बे हे खांडवी फाटा येथे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना भरधाव वेगात तवेरा गाडी क्रमांक एम एच 23 ई 8598 येताना दिसली असता गाडी थांबवण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे यांनी गाडीला हात दिला असता गाडी तिथे न थांबता सुसाट वेगाने आरोपींनी पळविली. सदर गाडीचा सुनील वावगे यांनी सिनेस्टाईल पाठलाग केला असता गाडीमधील आरोपींनी गाडी पूर्णा नदी पुलावरून पुढे नेऊन थांबवली व शेत रस्त्याने आरोपी पळत पसार झाले. सदर तवेरा गाडीची चेकिंग केली असता त्यामध्ये एक गाय असल्याचे दिसून आले. सदर गाडीला पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणून उभी केली. सदर तवेरा गाडी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील असल्याचे समजते. तवेरा गाडी मिळाल्याने तालुक्यातील जनावर चोरीचे अनेक गुंन्हे उघडकीस येणार आहेत त्यादृष्टीने पोलीस प्रशासन निश्चितच प्रयत्न करणार आहोत. सदर जनावर चोरीचे रँकेट उघडकीस आणून गुन्हेगारांना बेड्या ठोकणार असे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी सांगितले.जनावरांची चोरी करणारी टोळी जनावरांना बेशुध्द करून चोरून नेत आहेत.सदरची कारवाई मोबाईल गाडीचे चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे यांनी दाखवलेली हिम्मत व यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंठे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय राऊत, पोलीस कॉन्स्टेबल डब्बे यांनी दाखवलेली इच्छाशक्ती यामुळे सदर गाडी आणि गाय ताब्यात घेण्यात जळगाव जामोद पोलिसांना यश आले आहे. गाय आणि वाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणले असता सकाळीच गाय हरविल्याची फिर्याद देण्यासाठी जळगाव जामोद येथील वाडी खुर्द येथील रहिवासी प्रदीप डाबेराव हे आले असता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांची गाय त्यांना बांधलेली दिसली असता त्यांना अश्रू अनावर झाले. प्रदीप डाबेराव यांनी ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्यासह पोलीस प्रशासनाचे आभार मानले. सदरची कारवाई जळगाव पोलीस स्टेशनची मोबाईल गाडी नवीन असल्याने पाठलाग करणे शक्य झाल्याने गाडी आणि गाय हाती लागले. पुढील कारवाई ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंठे करीत आहेत.