
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : नव वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज रविवार, दि. १ जानेवारी २०२३ रोजीच (याच दिवशी) जन्मलेल्या कन्या रत्नाच्या परिवाराला दोन ग्राम सोन्याचं नाणं आणि दोन किलो जिलेबी भेट देण्यात येणार असल्याचं सन्नीसिंह यांनी जाहीर केले आहे.
स्पर्धात्मक युगात सर्वांनाच संधी मिळण्याची शक्यता दूरापास्त असते. गोर-गरीब महिलांना तर ती संधी मिळू शकेल असे सांगणे ही कठीण असते नव्हे तशी शक्यताच कमी असते. किंबहुना त्यांच्यावर तसा अन्याय होऊ नये, या उपक्रमात शक्यतो गोर-गरीब महिलांनाच संधी उपलब्ध व्हावी यासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्म घेणाऱ्या कन्या रत्नाच्या परिवारासाठी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.
मागील ११ वर्षांपासून हा उपक्रम धरमवीर सिंह दामोदर हे सातत्याने चालवत आहेत. यात कोणताही खंड पडू नये यासाठी त्यांचा मुलगा सन्नीसिंह हे हा उपक्रम नियमितपणे चालवत आहेत. सन्नीसिंह हे हरियानाफेम जिलेबी विक्रेते म्हणून प्रसिद्ध आहेत. परिवाराची उपजिविका साध्य करीत असतांना याच जिलेबी विक्री
व्यवसायातून समाजाचेही आपण काही तरी देणे लागतो, या सामाजिक भावनेने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात सन्नीसिंह व त्यांच्या परिवाराला धन्यता वाटते. त्यांना मानसिक समाधान मिळते.
सन्नीसिंह यांचा ‘बेटी बचाव’ चा संकल्प जरी असला तरी त्यांनी ‘बेटी नहीं तो, बहू कहां हे मिलेगी’ अशी उदात्त भावना मनी बाळगून जे सांगितले आहे, ते खरोखरच प्रबोधनात्मक असेच म्हणावे लागेल. ते पुढे असेही म्हणाले की, या घोषित दोन ग्राम सोन्यामध्ये भविष्यात यथाशक्ती वाढ केली जाईल. त्याशिवाय अन्य कोणत्याही रुग्णालयात कन्या रत्नांचे जन्म घेतला असेल त्या परिवाराला फक्त दोन किलो जिलेबी देण्यात येईल असेही सन्नीसिंह यांनी सांगितले आहे.
…या मातांचा साडी-चोळी देऊन सन्मान
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
जिल्हा रुग्णालयात आज जन्मलेल्या कन्या रत्नांच्या मातांना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. अशी माहिती आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ आणि परभणी परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष सचिन देशमुख आणि जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखाताई पुंडगे यांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन या मान्यवरांनी ज्या नवकन्या रत्नाच्या मातेचा साडी-चोळी देऊन यथोचित सन्मान केला, त्यांनाही समाधानकारक असेच वाटले असावे.
यावेळी सचिन देशमुख बोलतांना म्हणाले की, कन्या रत्न जन्मले म्हणून कोणीही नाराज न होता ‘बेटी ही धनाची पेटी’ अशी उदात्त भावना ठेवणे गरजेचे आहे. कन्या व माता यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहिजे. हेच कन्या रत्न भविष्यात कोणाची तरी बहीण, कोणाची वहिनी तर कोणाची पत्नी बनली जाणार असते. त्यामुळे कन्या किंवा माता यांच्याप्रति प्रत्येकाच्या मनात आपुलकी, जिव्हाळा, स्नेह निर्माण होणे गरजेचे आहे. ज्यामुळे कन्या रत्न असो वा माता-भगिनी यांना जगण्यासाठी अधिकाधिक स्वारस्य प्राप्त होऊ शकेल, त्यांना स्फूर्ती मिळू शकेल.
एकूणच काय तर कन्या रत्नांच्या प्रति समाजाची, संस्थांची किंवा मान्यवरांची बदलत चाललेली चांगली भावना समाधान कारक अशीच आहे