
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पूर्णा : एका २२ वर्षीय शाहरुखचा गळा आवळून खून केल्याच्या प्रकरणात लिप्त आरोपींच्या पूर्णा पोलिसांनी केवळ चोवीस तासाच्या आत तत्परतेने मुसक्या आवळण्यात मिळविलेले यश स्पर्हनीय असेच म्हणावे लागेल.
हिंगोली जिल्ह्यातून मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह पूर्णा नदी पात्रात मृतावस्थेत दिसत असल्याचं आढळून आलं. जवळ जाऊन शहानिशा केली असता मृतकाचे दोन्ही हात कशाने तरी आवळून बांधल्याचे निदर्शनास आले. शिवाय त्याच्या कमरेला भला मोठा दगड बांधून त्याला नदी पात्रात फेकून दिले असावे, असे हे प्रकरण संशयास्पद व घातपाताचेच असल्याचा दाट संशय निर्माण झाला.
पूर्णा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीं विरोधात गुन्हा नोंदवून त्या दिशेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आपल्या खबऱ्यां मार्फत खबर पाठवून संपर्क साधला असता तो युवक हिंगोली जिल्ह्यातील व हट्टा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे करंजी येथील असल्याचे समजले.
२९ डिसेंबर पासून करंजी येथून बेपत्ता असलेल्या युवकांचे नाव शाहरुख सुभान धनकर वय २२ असल्याचे कळले. अधिक तपास करता एका महिलेच्या छेडछाड प्रकरणी त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांचे दोन्ही हात आवळून कशाने तरी बांधण्यात आल्याचे व त्याच्या कमरेला भलामोठा दगड बांधून त्याला यासाठी शिवारातील पूर्णा नदी पात्रात फेकून दिले असावे, असेच यातून पुढे उजागर झाले.
उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सपोनि. आश्रोबा घाटे, फौजदार पोपलवार, अर्जून रणखांब, बंडू राठोड, मंगेश जुकटे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत प्रारंभी मयताची व तदनंतर त्याच्या नातेवाईकांची ओळख पटवली. त्यानंतर झालेला तपास सदर महिला छेडछाड प्रकरणा पर्यंत जाणे स्वाभाविक ठरला.
याप्रकरणी मयताचा भाऊ अखिल धनकर यांच्या फिर्यादीवरून करंजी येथील इस्माईल शेख, सिराज, त्याचा अल्पवयीन मुलगा, दोन अल्पवयीन भाचे यांच्यावर पूर्णा पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पूर्णा पोलिसांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील काळभोर परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबूली देत सदर खूनामागचे केलेले कथन आश्चर्यकारक असेच समोर आले.
त्यांनी २९ डिसेंबर रोजी मयत तरुण शाहरुख धनकर यास फोन करुन रात्री उशिरा यासाठीच्या पूलाजवळ बोलावले होते. रात्रौ अकराच्या सुमारास चार जणांनी शाहरुखचा गळा आवळून प्रथम खून केला. त्यानंतर त्याचे दोन्ही हात आवळून बांधले. कमरेला एक मोठा दगड बांधून त्याला पूर्णा नदी पात्रात फेकून देण्यात आले. त्यानंतर एम्.एच्. ३८ एस्. ५६८३ क्रमांकाची शाहरुखची मोटार सायकल नांदगाव ते कात्नेश्वर दरम्यानच्या एका ओढ्याच्या पुलाजवळ जाळून ती नंतर ओढ्यात फेकून दिल्याचे आरोपींनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आश्रोबा घाटे हे करीत आहेत असे समजले.