
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्यभरातील कोट्यावधींच्या आसपास ज्येष्ठ मतदार नागरिकांना आपल्याकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मेगा प्लॅन आखला असल्याची चर्चा पुढे आली आहे. नुकताच याप्रकरणी एस्.टी.महामंडळाचे संचालक मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे निर्देश दिल्याचे समजते. त्यांनीही या प्रस्तावास अनुकूलता दाखवून शनिवार व रविवार असे दोन दिवसीय दर्शन सुविधा घडवून आणली जाणार असून त्याविषयीचे नियोजन सुरु केले असून साधारण दोन हजार महामंडळाच्या एस्.टी. बस त्यासाठी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. परिवहन संचालक मंडळ आणि अन्य काही विशेष मान्यवर नेत्यांची जी महत्वाची बैठक झाली आहे, त्या मान्यवरांकडे अर्ध्या दरातील तिकिटांसाठी लागणारी ती पन्नास टक्के रक्कम अदा केली जाणार असल्याचे विश्वसनीय सुत्तानुसार बोलले जात आहे.
ज्यांचे वय ६५ वर्षे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या दरांत तर ज्यांचे वय ७० व त्यापेक्षा अधिक आहे, अशा ज्येष्ठांना एस्.टी.चा प्रवास राज्यात अगदी मोफतपणे करता येतो. ज्यांना अर्ध्या दरांत प्रवास करावा लागणार आहे, त्यांच्या प्रवास तिकीटाचे पैसे कोण्या तरी विशेष मान्यवरांकडून अदा केले जातील, याविषयीची तजवीज केल्याचे समजते. वय वर्षे ६० ते ६५ या गटातील आणि वय वर्षे ७० व त्यावरील वयाचे मिळून साधारण कोटींच्या पेक्षाही अधिक संख्येने ज्येष्ठ नागरिक राज्यभरात असू शकतात. राज्यभरात जे जे प्रमुख देवस्थान आहेत, त्या त्या देवस्थानांचे दर्शन कोट्यावधींच्या संख्येतील या ज्येष्ठांना अगदी मोफत प्रवास करवून मोफतपणे देवदर्शन घडविले जाण्याची योजना आखली जात असल्याचे विश्वसनीय वृत्तानुसार समजते.
राज्यात जे जे प्रमुख देवस्थान आहेत, त्यात पंढरपूर, शिर्डी साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, तुळजापूरची तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, कोल्हापूरची महालक्ष्मी-अंबामाता, ज्योतिबा आदी देवी-देवतांचा त्यात समावेश राहाणार आहे. एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही योजना खरी असेल आणि मूर्तस्वरुपात अंमलात आणली गेली तर निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षासाठी फलदायी ठरली जाईल, यात शंकाच नसावी.