
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
युवा सामर्थ्य प्रतिष्ठानच्या कार्याची दखल
जव्हार:- जनजाती विकास मंच आयोजित पालघर जिल्ह्याची चौथी चेतना परिषद डहाणूच्या वडकुन येथील पांचाळ हॉल येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजित गोवारी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली.या परिषदेत आदिवासी समाजातील नामांकित व्यक्तींना निमंत्रित करून आदिवासी समाज सध्याच्या युगात टिकून राहावा यासाठी प्रबोधन करण्यात आले.या परिषदेमध्ये दोन सत्रांचे आयोजन करून पालघर जिल्ह्यातील वाडा,विक्रमगड,जव्हार,पालघर व मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.परिषदेचे पहिल्या सत्राचे अध्यक्ष डॉ.प्रशांत कनोजा व विशेष अतिथी ॲड.रविंद्र वैजल तर उद्घाटक प्रदीप डोल्हारे सहाय्यक गटविकास अधिकारी वसई यांच्या हस्ते करून चेतना परिषदेच्या विशेष अतिथी म्हणून मातोश्री हॉस्पिटल जव्हारच्या बालरोग तज्ञ डॉ.जयश्री भुसारा-भोये यांना निमंत्रित केले होते तर मुख्य वक्ते म्हणून मध्यप्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव लक्ष्मण राजसिंह मरकाम यांची उपस्थिती या परिषदेत लक्षणीय ठरली.
पहिल्या सत्राचे प्रास्ताविक सादर करताना विकास मंचाचे सचिव छगन वावरे यांनी आदिवासी समाजाचे अस्तित्व,रामायणातील दाखले देऊन उद्बोधन करून संविधानाचे महत्त्व सांगून सुरुवात केली तर मंचाचे अध्यक्ष नरेश मराड यांनी विषयाची मांडणी करताना आदिवासी हा हिंदूच आहे हे पटवून देऊन सोळा संस्कार व समाजाचे पिढ्यान-पिढ्या चालत आलेल्या विविध प्रकारचे रितीरिवाज आणि सण-उत्सव यांची माहिती देऊन समाजाने जागृत झाले पाहिजे असा संदेश त्यांनी यावेळी दिला तर मुख्य वक्ते असलेले मरकाम यांनी आदिवासी समाजाचे अस्तित्व टिकावे व होणारे धर्मांतर रोखून समाज मजबूत होणे गरजेचे असून आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असून इंग्रजांचे आक्रमण आणि जनजातींचे नुकसान,आरक्षण,हिंदू शब्दाची उत्पत्ती यासारखी सखोल माहिती देऊन आदिवासी समाज टिकून राहणे ही काळाची गरज असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
तर दुसऱ्या सत्राची सुरुवात करतांना सत्राचे अध्यक्ष डॉ.संजय लोहार व विशेष अतिथी म्हणून उपक्रमशील शेतकरी सुनील कामडी यांच्या उपस्थितीत विषयाची मांडणी करताना संतोष जनाठे यांनी आदिवासी समाजाची मुख्य ऐतिहासिक ओळख याविषयी माहिती देऊन परिषदेत उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांनी सकारात्मक होण्याची गरज असल्याचे सांगितले.तसेच या चेतना परिषदेत आदिवासी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये पारंगत असलेल्या नामांकित व्यक्तींचा सत्कारमूर्ती म्हणून निवड करून त्यांचा मुख्य वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या परिषदेत पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाप्रमुख,जिल्हा कार्यकारणी सदस्य व शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित झाले होते.