दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ अमरावती विभागाची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूकीचे मतदान दि.३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत होणार आहे.यासाठी मतदान करतेवेळी भारत निवडणूक आयोगाने नमूद केलेले निवडणूक ओळखपत्र,आधारकार्ड,वाहन परवाना यापैकी कोणतेही ओळखपत्र सोबत बाळगावे.
मतदाराने मतपत्रिकेवर मत नोंदविण्यासाठी केवळ मतदान अधिकाऱ्याने दिलेल्या पेनाचाच वापर करावा.स्वत:जवळील पेनचा वापर करु नये.मतदानासाठी पसंतीक्रम देण्यासाठी रोमन,इंग्रजी किंवा देवनागरी लिपीतील अंकांचाच वापर करावा.मतदानाचा पसंतीक्रम नोंदवितांना रोमन,इंग्रजी आणि देवनागरी लिपीतील अंक सरमिसळ करुन एकत्रित नोंदवू नये.एकाच लिपीतील अंक नोंदवावे.
मत नोंदविताना कोणत्याही उमेदवारासमोर प्रथम प्राधान्य एक क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे.प्राधान्यक्रम एक क्रमांकानंतर इतर पसंतीक्रम नोंदविणे मतदाराला ऐच्छिक आहे.प्रथम प्राधान्य ‘एक क्रमांक’ केवळ एकाच उमेदवारासमोर नोंदविणे आवश्यक आहे.त्यापेक्षा जास्त उमेदवारासमोर एक पसंतीक्रम नोंदवू नये.तसेच एकाच उमेदवाराच्या नावासमोर एक क्रमांक आणि त्याच उमेदवाराच्या नावासमोर दोन,तीन,चार असे पसंतीक्रम नोंदवू नये.
त्याशिवाय मतपत्रिकेमध्ये उमेदवाराच्या नावासमोर चूक किंवा बरोबर असे चिन्ह नोंदवू नये.मतपत्रिकेवर रोमन,इंग्रजी आणि देवनागरी लिपीतील अंक सोडून इतर कुठलेही चिन्ह नोंदवू नये.पसंतीक्रम अक्षरामध्ये नोंदवू नये.तसेच पसंतीक्रमाची पुनरावृत्ती करु नये.पसंतीक्रम दिलेल्या चौकटीबाहेर जाऊ देऊ नये.दोन उमेदवारांना एक हा पसंतीक्रम नोंदवू नये.अशा प्रकारे मतदान करताना मतदारांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी,विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.


