दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:-संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील मरखेल मरखेल सर्कल गुत्तीतांडा येथील वडील व सासरच्या लोकांमध्ये झालेल्या वादाचा राग मनात धरून एका विवाहितेने पोटच्या दोन चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी एकच्या सुमारास गुत्तीतांडा (ता. देगलूर) येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहित महिला पूजा संतोष आडे (रा. गुत्तीतांडा) हिचे गावातीलच संतोष पांडू आडे यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना सिद्धार्थ (वयदोन) हा मुलगा व पुंदी (वय चार महिने) ही मुलगी झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी संतोष आडे हा हैदराबाद (तेलंगणा) येथे कामासाठी गेला होता. मात्र, तो गावी परत आल्यावर बुधवारी (ता. १८) संतोष हा कामाला जात असताना माझ्या मुलीला सोबत घेऊन जावे, या कारणावरून पुजाचे वडील नारायण सखाराम राठोड यांचा संतोष व संतोषचे वडील पांडु आडे यांच्यासोबत वाद झाला. या वादातून दोन्ही गटाकडून मारहाणही झाली होती. यात पांडू आडे यांना जबर दुखापत झाली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकारानंतर पूजा आडे हिने आपल्या दोन चिमुकल्या मुलांना स्वतःच्या वडिलांच्या शेतातील विहिरीत टाकून जीव घेतला तर स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदरील विहिरीत पाणी कमी असल्याने ती बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली. मरखेल ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्यासह पोलीस जमादार अब्दुल बारी, चंद्रकांत पांढरे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याबाबत मरखेल ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.


