दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- विभागीय महसूल आयुक्तालयाच्या जुन्या इमारतीच्या जागी नवे जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यात येणार आहे.२३.३० कोटी खर्च असून ही नवीन इमारत येत्या २ वर्षात पूर्ण करायची आहे.त्यासाठी विभागीय आयुक्तालयाची जुनी इमारत पाडण्याचे काम गुरुवार दि.१९ जानेवारीपासून सुरू झाले.विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी २ डिसेंबर २०२२ रोजी या नवीन इमारतीच्या बांधकामाची कार्यादेश जारी करण्यात आली होती.एकूण २२ महसूल विभागासाठी आवश्यक कार्यालये,पंप हाऊस,वाहनांसाठी सिमेंट काँक्रीट रस्ता,दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी शेड बांधण्यात येणार आहे.या नवीन इमारतीत तळघरासह ५ मजले असतील.जी प्लस ४ प्रस्तावित इमारत बांधली जाईल.सध्या जिल्हादंडाधिकारी कार्यालयाची इमारत अतिशय जुनी व कालबाह्य झाली आहे.मात्र,त्याची डागडुजी करून ती जतन करण्याच्या दृष्टीने वापरण्यात येणार आहे.
शासनाकडे २ कोटींची मागणी,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तत्कालीन पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांच्या कार्यकाळात तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तयार केला होता.त्यासाठी तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रालय स्तरावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला होता.अशाप्रकारे प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यतेने निधी उपलब्ध झाल्याने थेट बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एन.प्रकाश रेड्डी यांच्या देखरेखीखाली कंत्राटदार जमा झाले आहेत.सध्या बांधकामासाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.शासनाकडे दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.ही रक्कम लवकरच उपलब्ध होणार आहे.लेखी करारानुसार ही नवीन इमारत २ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण व्हायला हवी.
विभागाची २२ स्वतंत्र कार्यालये
विभागीय आयुक्तालयाच्या जुन्या इमारतीच्या जागी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध २२ कार्यालयांसाठी स्वतंत्र कार्यालये असतील.नगरपरिषद प्रशासन,रोजगार हमी योजना,खनिज विभाग,प्रकल्पांसाठी भूसंपादन विभाग व अन्य संबंधित कार्यालये स्थापित करण्यात येणार आहे.या सर्व कार्यालयांसाठी स्वतंत्र कार्यालयेही या नवीन इमारतीत राहणार आहेत.जिल्हा पुरवठा विभागाने यापूर्वीच नियोजन भवनाच्या नवीन इमारतीत स्थलांतरित केले आहे.


