
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (धारणी) :- धारणी जवळ – खांडव्याकडे जाणाऱ्या पिक-अप वाहनात बसलेल्या ५ जणांचा आज दुपारी २:३० वाजताच्या सुमारास देडतलाई ते शेखपुरा दरम्यान असलेल्या तापी नदीच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला.तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत.याशिवाय पिकअप वाहनातून प्रवास करणाऱ्या इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.सर्व जखमींना तातडीने खाकनार उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात असून यासोबतच पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार,आज दुपारी अडीचच्या सुमारास ट्रक क्रमांक एमपी ०९/केडी-१७२३ हा ऊस भरून खांडव्याहून देडतलाईच्या दिशेने जात होता.त्याचवेळी वाहन क्रमांक एमएच ४८/टी-४५०९ पिकअप मध्ये सुमारे २० ते २२ मजूर देडतलाई येथून स्वार होऊन खंडव्याकडे जाण्यासाठी निघाले होते.ही दोन्ही वाहने तापी नदीच्या पुलाजवळ पोहोचली.
त्यानंतर उसाने भरलेल्या ट्रकचा टायर अचानक फुटला आणि ट्रक अनियंत्रित झाला व समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा पुढील भाग चुराचुरा झाला.त्याचवेळी पिकअप वाहनात प्रवास करणाऱ्या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.यासह वाहनातील ९ जण गंभीर जखमी झाले.पार्वती रामसिंग दिनकर (३२,सुंदरदेव),नंदिनी रामसिंग दिनकर (१२,सुंदरदेव),दुर्गा काळू तांडीलकर (१४,सुंदरदेव),रमेश मंगल कोरकू (३५,सुंदरदेव),जामवंती रमेश कोरकू (३०,सुंदरदेव) अशी मृतांची नावे आहेत.या घडलेल्या अपघातात बसंती श्रीराम (४५,सुंदरदेव),गणेश रामचरण (१०,सुंदरदेव),छारासिंह कांशीराम (७,नागोतार),रवींद्र रमेश (१०,नागोतार),गुणीबाई रामचरण (४८,नागोतर),रामसिंग मोतीलाल (४०,सुंदरदेव),कौशल्या श्रीकेश (१५,सुंदरदेव),जगनकमल (१३,सुंदरदेव) आणि चंदाबाई नानकराम (३५,सुंदरदेव) हे गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच देडतलाई चौकी व खाकनार पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्याचवेळी घटनास्थळ मध्यप्रदेशच्या हद्दीत असल्याने खाकनार पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.यासोबतच अपघातात जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी खाकनारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.खाकनार पोलीसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.