
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
राज्यातील शेतकऱ्यांमध्ये वाढली उत्सुकता.
देगलूर:महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध
समस्यांकडे शेतकरी नेते तथा लोकनायक प्रकाश पोहरे हे बी आर एस पार्टीचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नांदेड येथील जाहीर सभेत शेतकऱ्यांना काय सल्ला देणार? याकडे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता लागली असून हजारो शेतकरी या सभेसाठी राज्यभरातून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील अनेक गावातील शेतकरी व नागरीकांच्या समस्या, याकडे राज्यशासन करीत असलेले दुर्लक्ष व तेलंगणा राज्यातील सरकार नागरीकांना देत असलेल्या सोयी-सुविधांमुळे सीमावर्ती भागातील शेतकरी दिवसेंदिवस तेलंगणाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहेत. हीच बाब हेरून भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाचे प्रमुख तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर नांदेड येथे ५ फेब्रुवारीलापक्षविस्ताराच्या अनुषंगाने पहिली सभा घेणार आहेत. या सभेला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी प्रश्नांचे गाढे अभ्यासक, लोकनायक तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या सभेत पोहरे हे शेतकऱ्यांना काय सल्ला देणार ? काय मार्गदर्शन करणार? याची उत्सुकता राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक राज्य सरकारला धारेवर धरणारे एकमेव शेतकरी नेते म्हणून प्रकाश पोहरे यांची सर्वदूर ओळख आहे, हे विशेष!
या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातील किसान ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते येत्या ५ फेब्रुवारी रोजी नांदेडकडे कूच करणार असून प्रकाश पोहरे हे शेतकऱ्यांना या सभेच्या माध्यमातून कोणता कानमंत्र देणार, याकडे राजकीय विश्लेषकांसह राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सूकता निर्माण झाली आहे.