
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले असून प्रतिस्पर्धी भाजपाचे डॉ.रणजित पाटील यांचा ३ हजार ३८२ मतांनी पराभव केला.
फेरीच्या मतमोजणी अखेर धीरज लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मते प्राप्त झाली,तर डॉ.रणजित पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली.विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा ४७ हजार १०१ इतका निश्चित करण्यात आला होता.धीरज लिंगाडे हे कोटा पूर्ण करू शकले नाहीत,परंतु सर्वाधिक मते प्राप्त करून ते विजयी ठरले आहेत.
रणजीत पाटालांचा अवैध मतांवर आक्षेप
पहिल्या पसंती क्रमाच्या फेरीत एकूण एक लाख २५८७ मतांपैकी आठ हजार ७३५ मते अवैध ठरली.भाजपचे उमेदवार डॉ.रणजीत पाटील या अवैध मतांवर आक्षेप घेतला.त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि अमरावती विभागाचे आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी अवैध मतांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.रात्री १ वाजताच्या सुमारास अवैध मतांची पडताळणी झाल्यावर यामध्ये धीरज लिंगाडे यांना ३३ मतांचा फायदा झाला.
दुसऱ्या पसंतीसाठी रात्री दोन वाजता मतमोजणी
पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीनंतर आणि डॉ.रणजीत पाटील यांनी अवैध मतांवर घेतलेल्या आक्षेपानंतर या अवैध मतांची पडताळणी झाल्यावर ४६ हजार ९२७ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.रात्री २ वाजता नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात झाली.पहिल्या पसंतीत क्रमात सर्वात कमी बारामती मिळालेल्या निलेश पवार यांना मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांच्या मोजणी पासून सुरुवात झाली.या बाद फेरीत एकूण 23 उमेदवारांपैकी २१ उमेदवार बाद होईपर्यंत मतमोजणीला प्रारंभ झाला.
रणजीत पाटलांच्या विरोधात घोषणाबाजी
मतमोजणी दरम्यान अवैध ठरलेल्या ८७३५ मतांवर आक्षेप घेण्यासाठी डॉ.रणजीत पाटील हे रात्री ११ वाजताच्या सुमारास मतमोजणी केंद्रावर पोहोचले असताना मतमोजणी केंद्राबाहेर हजर असणारे जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ.रणजीत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
महाविकास आघाडीचा जल्लोष
काँग्रेसचे धीरज लिंगाडे हे पहिल्याच फेरीत दोन हजाराच्या वर मतांनी आघाडीवर असल्याचे स्पष्ट होतात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात जल्लोष केला.काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला.शिवसैनिक,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौक येथे देखील जल्लोष केला.मतमोजणी केंद्राबाहेर जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने ढोल ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला.अमरावती शहरासह अकोला आणि बुलढाणा येथे देखील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.बुलढाणा येथे धीरज लिंगाडे यांच्या घरासमोर मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी करून लिंगाळे समर्थकांनी जल्लोष केला.महाविकास आघाडीचा विजय : विजयी उमेदवार धीरज लिंगाडे म्हणाले की, आज माझा अमरावती पदवीधर मतदारसंघात झालेला विजय हा खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे योग्य नियोजन आखून या विजयाचा मार्ग सुकर केला होता. अनेक शिक्षक संघटना आमच्या सोबत होत्या तसेच जुनी पेन्शन योजनेसाठी लढा देणाऱ्या संघटनांनी देखील आम्हाला साथ दिली,असे देखील धीरज लिंगाडे म्हणाले.
तीस तास चालली मतमोजणी प्रक्रिया
राज्यातील कोकण नाशिक नागपूर येथील निवडणुकीचे निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाले असताना अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सलग तीस तासापेक्षा अधिक वेळ चालली.