
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / पोखरभोसी : -जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने नवा मोंढा, नांदेड येथील मैदानावर जिल्हा कृषि महोत्सव सुरू आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार ३ मार्च २०२३रोजी जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी,शेतकरी गट ,शेतकरी उत्पादक कंपनी ,महिला बचत गट ,प्रक्रिया उद्योग करणारे गट आदींचा सन्मान करून गौरव करण्यात आला.
शेतकऱ्यांना उपजत असलेले ज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे. पिढ्यानपिढ्या जपलेल्या या ज्ञानाला अधुनिकतेची जोड देण्यासाठी नव्या पिढीतील युवकांनी पुढे आले पाहिजे, व जे शेतकरी पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन प्रगती साधत आहेत अश्या शेतकऱ्यांना कौतूक व्हावे यासाठी कृषि महोत्सवात प्रत्येक तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रत्येक तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी याप्रमाणे १६ शेतकऱ्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
यात लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील भाजीपाला ,बिजोत्पादन करणारे आदर्श शेतकरी संजय बापूराव ताटे यांचा समावेश आहे. शेतकरी संजय ताटे व त्यांच्या पत्नी पार्वतीबाई ताटे यांच्यासह कुटुंबानी हा सत्कार स्वीकारला
या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, आत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी सुरेंद्र पवार, अनिल चिरफुले, राजकुमार रणवीर,कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.माधुरी रेवणवार ,जिल्हा अधीक्षक, कृषिअधिकारी रविशंकर चलवदे आदी उपस्थित होते.
संजय ताटे हे मागील अनेक वर्षापासून भाजीपाला, बिजोत्पादनाची शेतीकरीत असून त्यांची ही शेती महाराष्ट्रातील तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. सिंजंटा, औमनसेंटा, महिको आदी कंपन्यासोबत ही शेती करीत असून एकूण ४ शेडनेट मधून झुकेनी, मिरची, टोमॅटो, काकडी ,कारले,दोडके, आदि भाजीपाला पिकाचे आधुनिक पद्धतीने बिजोत्पादन करीत आहेत. या मधून दरवर्षी लाखो रुपयाचे उत्पन्न त्यांना मिळत आहे या साठी त्यांना कृषी विभाग,संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. संजय बापूराव ताटे हे परिसरातील व महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना या शेतीसाठी प्रेरित केले आहे.पोखरभोसी हे गाव महाराष्ट्रात व जिल्ह्यात शेडनेट चे गाव म्हणून प्रसिद्ध झाले असून येथील शेतकरी दरवर्षी कोट्यावधीची उलाढाल करीत आहेत. कृषीविभाग, कृषी विज्ञान केंद्र, सिंजन्टा देउळगावराजा ,महिको कंपनी लिमिटेड जालना यांच्या सह इतर कंपन्याचे सहकार्य व मार्गदर्शनामुळे आज लोहा तालुक्यातील मौजे पोखरभोसी हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे.
संजय ताटे हे नांदेड जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण शेतीमध्ये प्रयोग साकार व शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे पोखरभोसी ता.लोहा येथील प्रगतिशील शेतक-यांच्या भाजीपाला बिजोत्पादनातील मास्टर म्हणून ओळखणा-या शेतक-याच्या बिजोत्पादन कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यानी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एक प्रगतशील शेतकऱ्यांस दिपावली निमित्त चहाफराळास त्याच्या शासकीय निवासस्थानी( वर्षा ) येथे बोलाविले होते .त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून प्रगतशील शेतकरी संजय बापूराव ताटे (सहपत्नी )यांना चहा फराळासाठी व त्याचा यथोचित सत्कार करण्या साठीआमंत्रित केले होते.त्यावेळी मुख्यमंत्र्याना रानमेवा म्हणून सिताफळ भेट दिले होते. भाजीपाला ,बिजोत्पादन ,टोमॅटोवर बिजोत्पादन कशा पद्धतीने करतात ते पहाण्यासाठी नांदेड जिल्ह्य़ाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांनी शेडनेटला भेट देवून पहाणी केली.विभागीय कृषी सहसंचालक( लातूर) तुकाराम जगताप, उपविभागीय कृषीअधिकारी रविकुमार सुखदेव, लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे,सामाजिक कार्यकर्त्या आशाताई श्यामसुंदर शिंदे,यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा ( आत्मा )अंतर्गत भाजीपाला बिजोत्पादन शेतकरी मेळाव्यात झुनकी या पिकांच्या बिजोत्पादनाची महीती सर्वाणी घेतली.व सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
प्रगतशील शेकरी संजय ताटे यांचा जिल्हा कृषी विभागाकडून गौरव केल्यामुळे ता.कृषी अधिकारी श्री पोटपेलवाड,
सहायक कृषी अधिकारी व पोखरभोसी व पंचक्रोशीतील शेतकरी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.