
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- वसंत खडसे
वाशिम : जिल्ह्याच्या राजकारणाचे उगमस्थान म्हणून रिसोड तालुक्यातील शेलूखडसे गावाची ओळख आहे.आणि त्याचे कारण ही साजेशे असेच आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर जिल्ह्यातील पहिले आमदार म्हणून वाशीम जिल्ह्याला बहुमान मिळवून देणारे स्व.आमदार नारायणराव पाटील खडसे हे याच गावाचे सुपुत्र होते. स्व. नारायणराव पाटील लोकल बोर्डचे प्रथम चेअमन सुद्धा होते. त्यामुळे आपसूकच तत्कालीन राजकीय घडामोडी ह्या शेलूखडसे गावातूनच घडायच्या म्हणूनच सदर गावाला जिल्ह्याच्या राजकारणाचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते. तथापि, सद्यस्थितीत सुद्धा स्व. नारायणराव पाटील यांचे नातू बाबाराव पाटील खडसे हे राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस असून जिल्ह्यातील एक प्रभावी नेते म्हणुन ओळखले जातात.त्यांचे सुपुत्र अमित पाटील खडसे हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. अमित पाटील खडसे यांचा रिसोड~मालेगाव तालुक्यात प्रचंड प्रमाणात जनसंग्रह असल्या कारणाने शेलुखडसे गावाला आजही राजकीय वलय आहे. याच गावातील झाडू, झोपाट्याचे विणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवनाऱ्या एका मागास प्रवर्गातील महिला रेणुका भानुदास ताकतोडे यांनी संपुर्ण गावकऱ्यांचा विश्वास संपादीत करून सरपंच पदाला गवसणी घातली आहे.गावकऱ्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत रेणुका ताकतोडे यांनी राजकारणात यशस्वी भरारी घेतली आहे. जागतिक महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने दै. चालु वार्ताने घेतलेला आढावा प्रस्तुत आहे.
सरपंच सौ रेणुका ताकतोडे यांना अठराविश्व दारिद्र्याचा सामना तर करावाच लागला पण, तेव्हढ्याच प्रमाणात जीवनातील असाह्य अशा दुःखद घटना सुद्धा पचवून घ्याव्या लागल्या. अविवाहित असतानांच वडिलाचे छत्र हरविले, त्यानंतर जवळच्याच नात्यातील भानुदास ताकतोडे यांच्याशी विवाह झाला. पतीसोबत सासरी भावी आयुष्याच्या स्वप्नांच्या रंग भरण्याच्या सुरुवातीतच इकडे देवाने आईचे छत्र ही हिरावून घेतले. आणि पाहता पाहता वडिलांचे संपुर्ण कुटुंबच उघड्यावर घडले. त्यामुळे आईवडिलांच्या माघारी अनाथ झालेल्या तीन लहान बहिणी आणि दोन भाऊ यांचं संगोपन करण्याची जबाबदारी रेणुका भानुदास यांच्यावर पडली. परिणामी पतीशी विचार्विर्मश करुन रेणुका ताकतोडे ह्या सासर सोडून माहेरवाशीण झाल्या. वडिलोपार्जित चालत आलेल्या झाडू, झोपाटे विनाण्याचा कामधंदा करून जेमतेम मिळणाऱ्या मोलमजुरीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मोठ्या कटकासरित तीन बहिणींचे लग्न व दोन भावांचे पदवी पर्यंतचे शिक्षणाची जबाबदारी रेणुका व भानुदास यांनी एकामेकांच्या मदतीने पार पाडली. ” शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही ” याची जाण असलेल्या या जोडप्यानं स्वतःच्या मुलाला देखील पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षा पर्यंत पोहचवले हे विशेष !
माहेरी नांदत असताना गावची लेकंबाळ म्हणून, सर्व जातधर्माच्या लोकांसोबत सलोख्याचे संबंध ठेवून वयोमाना नुसार प्रत्येकाला माय,बाप,भाऊ बहिणीचा सन्मान देत रेनुकाचा ताकतोडे परिवार अल्पावधीतच गावकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरला.म्हणूनच 2021 मधे झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच पद मागास प्रवर्गातील महिले साठी आरक्षित असतांना ग्रामस्थांनी रेणुका ताकतोडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. तथापि या निर्णयाला थोडफार विरोध झाला, आणि व्हायलाच पाहिजे कारण विरोधकांनाही वाव मिळावा हेच खऱ्या लोकशाहीचा उद्देश आहे म्हणूनच तर, बहुमताला किंमत आहे. सदर निवडणुकीत ” गाव करील ते राव काय करील ” या उक्तीचा प्रत्यय आला आणि ग्रामस्थांनी रेणुका भानुदास ताकतोडे यांना बहुमताने निवडून दिले. समाजातील सोज्वळ वर्तणूक, व्यवहारातील इमानदारी आणि कामातील प्रामाणिकपणाच्या बळावर समस्त गावकऱ्यांच्या आशीर्वादाने रेणुका ताकतोडे या लेकंबाळीने गावाचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान प्राप्त करून,ग्रामस्थांच्या विश्वासाला कुठेही तडा न जावू देता विविध ग्राम विकासाच्या योजना सर्वांना विश्वासात घेऊन यासाशविपणे राबवत सरपंच सौ रेणुका ताकतोडे सामाजिक कार्यात देखील उंच भरारी घेत आहेत.