दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरात असलेल्या जुन्या बस स्थानकाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली असून, येथे प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी नाही, तर बसायला आसन व्यवस्थाही नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.देगलूर सारख्या उपजिल्हा व मोठ्या शहराच्या बस स्थानकात आसन व्यवस्था नसल्याने, तासंतास प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते, तर काहींना बसण्यासाठी जमिनीचा आसरा घ्यावा लागत असल्याने, प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या या बस स्थानकातून लांब पल्ल्यांच्या गाड्यांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यामध्ये प्रवास करणारे खूप प्रमाणात प्रवासी येतात असतात. या बस स्थानकात बसपेक्षा खासगी वाहनेच अधिक प्रमाणात वर्दळ असते .
या बस स्थानकापासून दवाखाने, बाजारपेठ, शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालये जवळच असल्याने, ग्रामीण भागातील प्रवाशांसह शेजारील कर्नाटक व तेलंगणा राज्यातील प्रवाशांचीही येथे मोठ्या प्रमाणात गर्दीअसते.
मात्र, आवश्यक सोयीअभावी या बस स्थानकाची प्रचंड प्रमाणात
दुरवस्था झाली असून, येथे प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने आजूबाजूला हॉटेलमध्ये जावे लागते. देगलूर मध्ये सर्व लोकप्रतिनिधी व पक्षप्रमुख मोठे दावे करून देगलूरला एक आदर्श तालुका करण्याचे दावे करतात आणि एकीकडे त्याच तालुक्यामधील बस स्थानकाची अशी अवस्था आहे तरी लवकरात लवकर प्रशासनाने या विषयाकडे लक्ष घालून देगलूर शहरातील व देगलूर तालुक्यातील नागरिकांना चांगली सुविधा कशी देण्यात येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
