
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर : देगलूर तालुक्यातील सोमुर येथील गावामध्ये अवैधरित्या देशी दारू व गावठी दारू खुलेआम विक्री होत असल्याने या गावातील नागरिकांचे संसार उद्धस्त होत असल्याने येथील बचतगट महिला व गावातील महिलांनी ही होणारी दारू विक्री बंद करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सोमूर या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या गावांमध्ये विनापरवाना अवैधरित्या गावठी दारू व देशी दारू खुलेआम विक्री होत असल्यामुळे येथील शेतकरी, गोरगरीब मजूरदार, नागरिक या दारूच्या आमिषाला बळी पडून दिवसभर मोलमजुरी करून संध्याकाळी केलेली कमाई या दारूवर घालवित असल्यामुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने येथील महिला या दारूमुळे त्रस्त झाल्या आहेत. तरी लवकरात लवकर या गावातील दारू बंद करावी, अशी मागणी येथील महिला बचतगटाच्या वतीने व गावातील महिलांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली आहे. या निवेदनावर शेकडो महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.