
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करणे, कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करणे अशा एकूण १८ मागण्या मान्य करुन घेण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यावेळी देगलूर तहसील ऑफिस समोर झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी संप एकच मिशन जुनी पेन्शन व कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देऊन झोपलेल्या सरकारला जागा करण्याचे काम संपकरी करत आहेत. या संपात देगलूर तालुक्यातील विविध कार्यालयातील बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाल्यामुळे संबंधित कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे.
नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी, कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करण्यात यावे, रिक्त पदे भरण्यात यावीत, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिनशर्त करण्यात याव्यात, केंद्राप्रमाणेच वाहतूक, शैक्षणिक व इतरभत्ते देण्यात यावेत. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्यात यावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे थांबविण्यात आलेले पदोन्नती सत्र पुन्हा सुरु करण्यात यावे, शिक्षणसेवक, ग्रामसेवक यांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढत्या महागाईच्या अनुषंगाने विचार करून वाढ करण्यात यावी, अशा एकूण १८ मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात सरकारी, निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायतचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक व महसूलचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे विविध विभागातील दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे.