दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी – वसंत खडसे
वाशिम : मराठा, कुणबी, नोंदनीकृत मजूर आदी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून, शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. तथापि सदर योजने अंतर्गत दिला जाणारा आर्थिक लाभ गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या गंभीर समस्या बाबत दै. चालु वार्ताने दि. १५ मार्चच्या अंकात ” डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचा लाभ कधी मिळणार ” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून सदर दुर्लक्षित व महत्त्वाच्या शैक्षणिक समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले होते. दै. चालु वार्ताच्या या लक्षणीय वृत्ताची शासनाने त्वरित दखल घेऊन प्रलंबीत असलेली डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना सबंधित महाविद्यालयातील वसतिगृहात प्रवेश मिळत नाही आशा विद्यार्थ्यांना शहरात कुठेतरी जागा भाड्याने घेऊन राहावे लागते. त्यामुळे उपरोक्त घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांना हा खर्च त्यांच्या आवाक्या बाहेर असतो. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना खुप महत्त्वाची मानली जाते. सदर योजनेचा लाभ ऐन अडचणीच्या वेळी लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनी वरून दै. चालु वार्ताप्रती आभार व्यक्त करीत सबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा शासानाप्रती समाधान व्यक्त केले आहे.
