
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
पुणे – राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्रात विशेषतः सह्याद्रीच्या डोंगररांगामधील अनेक ट्रेकर्सचे आवडीचे ठिकाण असलेल्या मुळशी तालुक्यातील घनगट किल्ल्याजवळील तैल-बैल परिसरातील भांबर्डे नवरा,नवरी व कलवरी असे तिन्ही सुळके एस. एल. एडव्हेंचर संस्थेच्या गिर्यारोहकांनी एकाच दिवशी यशस्वीपणे सर केले.
प्रस्तरारोहणाची पंढरी असलेल्या तैल-बैल सूळक्यांवरून ताज महालाप्रमाणे दिसणारे हे भांबर्डे येथील तीन सुळके अनेक ट्रेकर्सचे आवडीचे पण तितकेच थरारक अनुभव देणारे आहेत मात्र पुण्यातील एस. एल. एडव्हेंचर संस्थेच्या गिर्यारोहकांनी योग्य माहिती,प्रस्तरारोहणसाठी लागणारे साहित्य आणि सुरक्षिततेची परिपुर्ण काळजी घेऊन एकाच दिवसात तीनही सुळके सर करण्याची किमया केली आहे.
१२ मार्चला रात्री ११ वाजता हे गिर्यारोहक भांबर्डे गावच्या आश्रम शाळेच्या पटांगणात पोहोचले तिथेच टेंट लावून मुक्काम केला आणि भल्या पहाटे सुळक्यांकडे प्रस्थान केले. एक खडी चढण चढून अर्ध्या तासांमध्ये दोन्ही सुळक्यांच्या मधील खिंडीमध्ये पोहोचले. मानसिंह चव्हाण यांनी लीड करत क्लाइम्बिंगचा श्रीगणेशा केला. 20 फूट चढाई केल्यावर उभ्या भेगेतील चिमणी पद्धतीने चढाई करावी लागते. त्या ठिकाणी वजीर वीर कृष्णा मरगळे यांनी चढाईचे खूप छान प्रात्यक्षिक सादर केलं. उर्वरित चढाई तुषार दिघे व मानसिंह चव्हाण यांनी पूर्ण केली. त्यांनंतर शिरीष कुलकर्णी आणि अनंत कोकरे यांनी चढाई केली. सुळक्यावर पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय…. जय भवानी… जय शिवाजी… या घोषणांनी भांबर्डे परिसरातील आसमंत दणाणून गेला होता. त्यांनंतर नवरी व कलवरी असे एका पाठोपाठ एक असे सुळके या टीमने सर केले. येथील सुळक्यांचे दगड अत्यंत ठिसूळ असून करवली सुळक्यावर जाणारी वाट निसरडी असल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक व संयमाने जावे लागले.
हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद करण्याची जबाबदारी विनोद गायकवाड यांनी पार पाडली. तर संस्थेचे प्रमुख लहू उघडे यांनी सर्व गिर्यारोहकांचे कौतुक व अभिनंदन केले.