
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:१४ मार्चपासून राज्याच्या
विविध भागातील सुमारे १८ लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व सेवांवर विपरीत परिणाम झाला आहे; तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरची चिंता भेडसावीत आहे. या कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे. एक वेळ आमचे पेन्शन बंद करा; परंतु संपकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. अशी आग्रही मागणी देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापुरकर यांनी १६ मार्च रोजीविधानसभेत केली.
सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभा सदस्य आपापल्या मतदारसंघातील समस्या शासन दरबारी मांडत आहेत. १६ मार्च रोजी देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापुरकर यांनी सध्या संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांची बाजू घेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आग्रही मागणी केली. त्याचबरोबर मतदार संघातील महादेव कोळी व मन्नेरवारलू जातीच्या नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अडचणी येत असल्याचे सांगताना ते पुढे
म्हणाले की, केंद्र शासनाच्या १९५०-५६
आणि ७६ च्या गॅजेटमध्ये मराठवाड्यात महादेव कोळी, मन्नेरवारलू जमातीचे लोक राहतात. असा स्पष्ट उल्लेख आहे; परंतु या जमातीच्या लोकांची जात पडताळणी कार्यालयातील अधिकारी जाणीवपूर्वक अडवणूक करीत आहेत. हे अधिकारी या दोन समाजांतील लोकांना शिक्षण आणि नौकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन सध्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचा आदेश द्यावा. देगलूर- बिलोली मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरावस्था झाली आहे. या शाळांना इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर शाळेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर बसगाड्या नसल्यामुळे महामंडळाची बससेवा वाढविण्यात यावी. महिला आणि बाल विकास विभागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी तसेच शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनिसांचे देखील मानधन वाढविण्यात यावे. अशा मागण्या आ. जितेश अंतापूरकर यांनी विधानसभेत मांडल्या.