
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
नांदेड दक्षिण मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात प्रचंड गारपीट व वादळी वार्यासह मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. तत्पूर्वी आ.मोहन आण्णा हंबर्डे यांनी हा प्रश्न सभागृहातही उपस्थित केला होता.
आ. मोहन आण्णा हंबर्डे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यांनी निवेदनात नमुद केले की, नांदेड दक्षिण मतदारसंघासह लोहा, अर्धापूर, हदगाव, कंधार, नायगाव, बिलोली या प्रमुख तालुक्यासह परिसरात प्रचंड वादळी वार्यासह गारपीट झाली. शेतीपिकासह शेतकर्यांच्या पशुधनाचेही अतोनात नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने शेकडो कुटुंब उघड्यावर आली आहेत. घरातील साहित्यांची प्रचंड नासाडी झाली आहे.
शेतीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीने मोसंबी , केळी , संञा , चिकु, टरबुज, खरबुज , गहु , ज्वारी, हरभरा, पाल्यभाज्यासह अन्य पिकांचे पण नुसकान झाले असुन शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला असुन नांदेड जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला असुन तात्काळ पिकांचे , गारपीटीने पडझड झालेल्या घरांचे , व काही ठिकाणी जनावरे वीज पडून दगावली असुन तात्काळ पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.