
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील विद्यार्थी शिक्षक यांनी लिहिलेले लेख, कविता इत्यादी साहित्य आमची प्रतिभा नावाने नुकतेच नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे यांच्या रूपाने मुखेड तालुक्याला एक कवी मनाचे साहित्यिक अधिकारी लाभले आहेत त्यांनी मुखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील नवोदित बालसाहित्यिकांचा आणि शिक्षक साहित्यिकांचा शोध घेऊन त्यांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी आमची प्रतिभा या हस्तलिखिताची संकल्पना मांडली. त्याला मुखेड तालुक्यातील विद्यार्थी शिक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि
विषय तज्ञ श्रीकांत थगणारे आणि प्राथमिक शिक्षक अरविंद थगणारे यांच्या सुंदर हस्तकुंचल्यातून आमची प्रतिभा ची निर्मिती झाली.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुखेड तालुका शिक्षण विभागाचे कौतुक केले.
हस्तलिखित निर्मितीस सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय तज्ञ, विशेष शिक्षक यांनी सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे यांनी आभार व्यक्त केले