
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील मौजे उखळी (खुर्द) परिसरात शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी विजेचा गडगडाट व पाऊस आल्याने याच गावातील शेतकरी बालासाहेब बाबुराव फड वय 50वर्ष व त्यांच्याच शेतात सालगडी म्हणून काम करणारे जयवंत नागरगोजे वय 35वर्ष हे दोघेजण पावसापासून बचाव व्हावा यासाठी शेतातील बाभळीच्या झाडाखाली थांबले असता विजेचा कडकडाट होऊन वीज बाभळीच्या झाडावर पडल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तर या झाडापासून जवळच थांबलेल्या शेतमजूर राहिबाई बाबुराव फड वय 70 वर्ष, राजेभाऊ किसन नरवाडे वय 40 वर्ष, सतीश सखाराम नरवाडे वय 35 वर्ष हे तीघे जण या विजेच्या उष्णतेमुळे भाजल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या तिघांना ही तातडीने गंगाखेड उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यांच्यापैकी राहिबाई फड यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालय येथे हालविण्यात आले आहे.
उखळी (खुर्द) येथे वीज पडल्याची घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव गावडे, गंगाखेड पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक वसुधंरा बोरगावकर पोलिस उपनिरीक्षक संदिप गडदे, पोलिस हवालदार देवकते यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.