
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे विद्यालयाच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन गंगाखेड शहरातील पुजा मंगल येथे कार्यालय शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी सायं.ठीक 06:00 वा. मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लहू घरजाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सगट सर गट शिक्षणाधिकारी गंगाखेड, शिवाजीराव फड केंद्र प्रमुख गंगाखेड, गुट्टे काका मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, गंगाखेड प्रभारी हनुमान मुंडे, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, रामदास मुंडे भाई मुख्याध्यापक उद्धवराव पाटील विद्यालय उक्कडगाव, संभाजी वाडेवाले माझी केंद्र प्रमुख गंगाखेड, मकरंद मरगिळ मुख्याध्यापक लोकनेते गोपीनाथराव मुंडे विद्यालय गंगाखेड यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी असे सांगितले की स्नेहसंमेलने घेणे ही शाळेची संस्कृती असते. अभ्यास, सराव परीक्षा, कला गुण, व्यायाम, कसरती, खेळ याच प्रमाणे दर वर्षी होणारे स्नेहसंमेलनदेखील शालेय संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो.
शालेय स्तरावर अशी स्नेहसंमेलन होत असल्याने मुलांना त्यांच्यातली कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते.
नेतृत्व, नृत्य, गायन, वाद्य, सूत्रसंचालन आणि आत्मविश्वास वाढण्यास स्नेहसंमेलनामुळे चांगली मदत मिळते. असे यावेळी डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक व गंगाखेड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.