दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : गत काही दिवसापासून हवामानात अचानक बदल झाल्यामुळे वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. परिणामी रिसोड,मालेगाव व इतर तालुक्यात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याचे चित्र समोर येत आहे. हाती आलेल्या माहितनुसार रिसोड तालुक्यातील महागावला गारांच्या पावसाने झोडपले असून, रब्बी हंगामातील उशिरा पेरणी झालेल्या हरभरा व गहू पिकांसह हळद, कांदाबीज व इतर फळबागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर नुकसानग्रस्त भागाची प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी. अशी मागणी महागावचे सरपंच तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष संतोष मवाळ यांनी खासदार संजय धोत्रे यांच्याकडे केली आहे.

खरिपातील अतिवृष्टी, मध्यंतरी आलेले दाटधूके आणि आता अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, बाजारपेठेत शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कंगाल झाले आहेत. अशा विपरीत परिस्थितीत केवळ पिकविम्याची रक्कम देऊन भागणार नाही, तर किमान उत्पादन खर्च वसूल होईल अशी ठोस मदत राज्य व केंद्र सरकारने द्यावी याबाबत आपण पाठपुरावा करावा अशी विनंती देखील महागावचे सरपंच संतोष ज्ञानबा मवाळ यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांच्याकडे केली आहे. तथापि, खा. धोत्रे यांनी सरपंच संतोष मवाळ यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी खासदार कटिबध्द असल्याचे माहिती सरपंच तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष संतोष मवाळ यांनी दै. चालु वार्ताच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
