
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-जिल्ह्यात इन्फ्लुएंझाचे रूग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तपासण्यांचे प्रमाण वाढवावे.आवश्यक तिथे तत्काळ उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा,असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.
जिल्ह्यात उद्भवलेल्या इन्फ्लूएंझा संसर्ग एच-३ एन-२ आजाराविषयीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा,पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दिलीप सौंदाळे,डॉ.प्रमोद निरवणे,डॉ.सुभाष ढोले,डॉ.प्रशांत घोडाम,इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ.विक्रम देशमुख,डॉ.प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की,बाधित रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत,यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी.रोज किमान एक हजार तपासण्या व्हाव्यात.औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी.लसीकरणाचा वेग वाढवावा.आवश्यक तिथे खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी.इन्फ्लुएंझाची लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत.तातडीने उपचार सुरु केल्यास रूग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
कोविड १९,तसेच इन्फ्लूएंझाबाबतीत नियमित रुग्ण सर्वेक्षण,सहवासितांचे सर्वेक्षण आवश्यक आहे. विषाणूची लक्षणे दिसताच ७२ तासांच्या आत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो.ही माहिती सर्वदूर पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
चौकट
—————————————-
*मार्गदर्शक सूचना*
इन्फ्लूएंझाचे टाईप अ,ब,आणि क,असे प्रकार आहेत.इन्फ्लूएंझा टाईप ‘ए’ चे उपप्रकार एच-१ एन-१,एच-२एन-२,एच३ एन-२ असे आहेत.यात ताप,खोकला,घशात खवखव,धाप लागणे,न्यूमोनिया अशी लक्षणे आढळतात.
यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.यात,रुग्णाच्या सहवासात आल्यापासून दहा दिवसांत फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.सर्दी खोकला अंगावर काढू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लूवरील औषध सुरु करावे.डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या उपचारा सोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी.खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हात रुमाल वापरावा.आजारी व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे,अशा सूचनांचा समावेश आहे.