
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनीधी – वसंत खडसे
वाशिम : सरपंच सेवा संघ महाराष्ट्र महिला आघाडीच्या रिसोड तालुकाध्यक्ष पदी महागावच्या लोकनियुक्त सरपंचा सौ. रुपालीताई संतोष मवाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाळासाहेब पावासे यांच्या मार्गदर्शनात सरपंच सेवा संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष डॉ. प्रमोद अनिल गंगावणे यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
रिसोड तालुक्यातील महागावच्या लोकनियुक्त सरपंचा सौ. रुपालीताई मवाळ यांचे सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तथा, गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन दरबारी त्यांच्याकडून होत असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आदी बाबींचा विचार करून, तालुक्यातील व जिल्ह्यातील सरपंचांना संघटीत करावे व त्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात यावे या उद्देशाने सौ. रुपालीताई मवाळ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.
सदर नियुक्ती बाबत प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना नवनियुक्त तालुकाध्यक्ष म्हणाल्या की, आज संपूर्ण जगात बदल झालेला दिसत असला तरी मात्र, आज ही गाव पातळीवर स्त्रियांच्या बाबतीत ” चूल आणि मुल ” ही अगदी जून्या काळातील परंपरा मोठ्या प्रमाणात जोपासल्या जात असल्याचे चित्र कायम आहे. शासनाने नमूद केलेल्या महीला आरक्षणा व्यतिरिक्त इतर सरसकट राजकीय सत्तेत महिलांना विशेषतः ग्रामीण भागात स्त्रियांना फारसं महत्त्व दिल्या जात नाही हे आजचं अगदी सर्वश्रुत वास्तव आहे. यात अधिकाधिक बदल व्हावा, त्या अनुषंगाने महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी आपण सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून काम करणार आहोत, तद्वतच मुलींच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी, स्त्रियांवरील होणारे अत्याचार, त्यांची आर्थिक दुर्बलता, आणि महत्त्वाचे म्हणजे असुरक्षितता यात प्रामुख्याने बेकरांचा व गुंड प्रवृत्तीच्या टवाळखोरांचा त्रास, गावोगावी सुरू असलेले दारू~मटक्याचे अड्डे यामुळे ग्रामीण भागात निर्माण होणारे भीतीचे वातावरण अशा अनेक गंभीर समस्या नियंत्रणात आणण्यासाठी सदर संघटनेच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी करणार असल्याचा मनोदय सौ रुपालीताईंनी व्यक्त केला आहे. त्यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याचे माहिती पडताच रिसोड तालुक्यासह, संपूर्ण वाशिम जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.